- रवींद्र देशमुख सोलापूर/सांगोला - माझी भूमिका पूर्वीची जी होती तीच आहे, आम्ही भूमिका बदलणाऱ्यापैकी नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी माझा पाठिंबा आहे. सर्व नेत्यांनी मिळून जरांगे यांच्या आंदोलन स्थळी भेटी न देता कायदे तज्ञ, कागदपत्रे सोबत घेऊन एकत्रित बसून निर्णय घेतल्यास ७ ते ८ दिवसात मराठा आरक्षणावर मार्ग निघेल, असे स्पष्ट मत भाजपच्या राष्ट्रीय नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगोल्यात व्यक्त केले.
माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या शिवशक्ती परिक्रमा यात्रा अभियानातंर्गत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्या गुरुवारी सांगली येथून पंढरपूरला जाताना सांगोला येथे आल्या होत्या.यावेळी सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर त्यांनी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पत्नी रतन काकी देशमुख ,नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासमवेत चर्चा केली.
स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विधानसभेतील कामकाजाच्या जुन्या आठवणी सांघगून त्यांनी मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्यासोबत दोन वेळा मला विधानसभा काम करण्याची योग आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन समाधान पाटील औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण पाटील सूतगिरणीचे संचालक विनायक कुलकर्णी खरेदी विक्री संघाचे संचालक वैभव केदार ,ॲड मारुती ढाळे, माणिकचंद वाघमारे, युवक नेते दत्ता टापरे ,आकाश व्हटे आदी उपस्थित होते.