- बाळकृष्ण दोड्डी सोलापूर : सिंचन विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अखेर चक्री उपोषण थांबवले. आमदार प्रणिती शिंदे व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या मध्यस्थीनंतर पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी पुढील दोन महिन्यात सोडवू. त्या संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, असे सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांनी चक्री उपोषण मागे घेतले.
माजी आमदार आडम यांनी सिंचन विभागातील अधिकाऱ्यांसोबत या प्रश्न बैठक घेतली. बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. वय वर्ष ४५ दरम्यान प्रशिक्षण व विभागीय परीक्षेतून सूट न दिल्याने जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदापासून वंचित राहिले आहेत.
शासनाच्या सूचनेनुसार १३ पदावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सूट देण्याची मागणी सेवानिवृत्त स्थापत्य सहायक व क्षेत्रीय कर्मचारी कृती समितीकडून होत आहे. मागणी मान्य होत नसल्याने मागील १८ दिवसांपासून सेवानिवृत्त कर्मचारी सिंचन भवनासमोर चक्री उपोषण केले. यातील दोन उपोषणकर्त्यांची आंदोलनस्थळी तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले. या प्रकरणी ‘ लोकमत ’ मध्ये बातमी प्रसिद्ध होताच अधिकारी खडबडून जागे झाले बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.