सोलापूर : भर उन्हात सायकलीला घागरी लावून पळणारी मुले.. टँकरच्या प्रतीक्षेत असणारे नागरिक... सार्वजनिक पाणवठे, हापसा, बोअर ठिकाणी गर्दी़.. महापालिकेच्या विभागीय (झोन) कार्यालयात कर्मचाºयांकडून प्रयत्ऩ़़ टँकर येताच गलका.. हद्दवाढ भागात पाचव्या दिवशी सर्वसामान्यांना दाही दिशा धावताना दिसून आले.
एरव्ही शहराला दररोज पाणीपुरवठा होण्याबाबत चर्चा होणाºया महापालिकेकडून ऐन उन्हाळ्यात तीन दिवसाआडचे चार दिवसाआड आणि आता पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतोय़ घोषणेनुसार पाचव्या दिवशी सकाळचा सायंकाळी पाणीपुरवठा होतोय़ विस्कळीत पाणीपुरवठ्याचा, वेळापत्रकाचा नागरिकांतून नाराजी उमटत आहे़ पंधरा दिवसांपूर्वी हद्दवाढ भागात वसुली मोहीम हाती घेतलेल्या पथकाला या काळात कोणत्याच नगरात फिरता येईना.
दुसरीकडे याच प्रशासनाला मंगळवारी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी धावाधाव करावी लागली़ सध्या आचारसंहिता असल्याने सर्वसामान्यांना नगरसेवकांकडेही जाऊन गाºहाणी मांडता येत नाही, पालिका आयुक्तांना जाऊन भेट घेता येत नाही़ अशा विचित्र परिस्थितीचा सामना करणारे हद्दवाढवासीय दिवसभरात पाणीपुरवठ्याच्या पर्यायाच्या शोधात होते.
अनेक कुटुंबे दुचाकीवर घागरी, हंडा घेऊन पाण्याच्या शोधात पाहायला मिळाले़ स्वागतनगर, नई जिंदगी या परिसरातील मजूर लोक यांची आज सकाळी सार्वजनिक हातपंपावर पाण्यासाठी लांबलचक रांग पाहायला मिळाली. पाणी पातळी खालावल्याने काही ठिकाणचे हातपंप जड जाताना निदर्शनास आले.
आज उशिरा, कमी दाबाने पाणीपुरवठा- औज बंधारा कोरडा तर चिंचपूर बंधारा शून्यावर आल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाचव्या दिवशीही सोलापूरकरांना पाणी मिळाले नाही. हा निर्णय घेतल्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना फटका बसला. चौथ्या दिवशीचे नियोजन असलेल्या नगरात पाणी आले नाही, तर पाचव्या दिवसाच्या नियोजनातील भागालाही पाणी सोडण्यात आले नाही. या व्यत्ययामुळे २७ मार्च रोजी ज्या भागात पाणी सोडण्यात येणार आहे त्या भागालाही आता उशिरा व कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी सांगितले.
हद्दवाढवासीय चावीवाल्याच्या प्रतीक्षेत- हद्दवाढ भागात बाळे, शेळगी, दहिटणे, मजरेवाडी, नेहरूनगर, कुमठे, सोरेगाव या भागात मंगळवारी पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या भागाला पूर्वी चार दिवसाआड पाणीपुरवठा व्हायचा़ आता तो पाच दिवसाआड झाला़ तसेच ज्या भागाला सकाळी पाणीपुरवठा व्हायचा तेथे आता सायंकाळी होऊ लागला़ काही घरातील लोक पाचव्या दिवशी सकाळी पाणीपुरवठा होईल या समजुतीने भांडी धुऊन रिकामी केली़़़मात्र चावीवाला सायंकाळी येऊन पाणी सोडणार असे समजताच तोंडचे पाणी पळाले़ या लोकांनी खासगी पाणीपुरवठादारांकडून जार मागवून दिवस भागवला़ कुमठे परिसरात नेमके हेच चित्र पाहायला मिळाले़ सायंकाळी ६ वाजता पाणीपुरवठा झाला़ या भागातील नागरिक दिवसभर चावीवाल्याच्या प्रतीक्षेत होते़
४० रुपये बॅरलने पाणीपुरवठा- पाचव्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत होताच दयानंद महाविद्यालय, कुमठे परिसरात आमराई, गुरुनानक-कुमठा नाका रोडवर गुरुद्वार, देगाव रोड अशा अनेक मार्गांवर खासगी पाणीपुरवठादारांनी ४० रुपये पिंप (बॅरल) पाणीपुरवठा सुरू केला आहे़ सध्या खासगी पाणीपुरवठादारांचा धंदा जोरात सुरू आहे़ काही ठिकाणी वॉटर प्युरिफायर केंद्रावरुन ४० रुपयांना जार पुरवला जात आहे़ पाचव्या दिवशी हद्दवाढ भागात जार पुरवठा करणाºया गाड्या दिसल्या़
बांधकाम थांबले- हद्दवाढ भागात कुमठे, मजरेवाडी, साखर कारखाना परिसरात पंतप्रधान आवास योजनेतून अनेक घरकुलांचे काम सुरू आहे़ खासगी पाणीपुरवठा केंद्राकडे आज पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी पाणी मागणी झाली़ त्यामुळे या केंद्रावरून या बांधकामांना पुरवठा होणारे पाणी आज घरोघरी पुरवताना पाहायला मिळाले़ त्यामुळे काही ठिकाणी बांधकामही रखडताना पाहायला मिळाले़