- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - राज्याच्या राजकारणात जे घडलंय त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आता फक्त जे जे घडतंय ते फक्त बघत राहायचं. ज्या पध्दतीने दोन - दोन मुख्यमंत्री झालेत, ती नवी प्रथा आता महाराष्ट्रात सुरू झाली का काय असेच वाटत आहे असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली मात्र काँग्रेस पक्ष कधीच फुटणार नसल्याचा दावा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरात कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते. त्यावेळी कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस कधीच फुटणार नसल्याचा दावा केला. राष्ट्रवादी फोडण्यात आली त्यानंतर आता काँग्रेस फोडण्यासाठी प्रयत्न सुरू होत आहेत, याबाबत सुशीलकुमारांना विचारले असता ते म्हणाले की, मला नाही वाटत काँग्रेस फुटेल. काँग्रेस विचाराने पक्की आहे. काँग्रेस कधी फुटणार नाही. मागे एकदा फुटली ते झालं आता यापुढे कधीही फुटणार नसल्याचे स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी दिले.
तीन पक्षाचे सरकार राज्यात आले आहे, त्याबाबत काय सांगाल असे पत्रकारांनी विचारले असता शिंदे म्हणाले की, आता ते बघायचं आहे. कशा पध्दतीने सरकार चालवितात. राष्ट्रवादी एकदा फुटलेली आहे, आता त्यांना ओढून परत आणता येणार नाही. त्यामुळे आता निरीक्षण करणे गरजेचे आहे. निवडणुका येत आहेत. सर्वसामान्य जनताच आता त्यांना धडा शिकवेल याविषयी माझ्या मनात शंका नसल्याचेही शिंदे म्हणाले. नव्या परिस्थितीत जे जे होतंय ते पाहायचं आहे. नव्या राजकारणांवर सर्वसामान्य लोक चिडले आहेत, याचा नक्कीच परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल असेही शिंदे यांनी सांगितले.