'विरोधात मी उमेदवार, मग वडिलांवर टीका का? मला भिडा'; प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 06:28 PM2024-03-28T18:28:05+5:302024-03-28T18:28:59+5:30
Solapur Lok Sabha 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने राम सातपुते यांना तर काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
Solapur Lok Sabha 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने राम सातपुते यांना तर काँग्रेसनेप्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, राम सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्या मालमत्तेचा हिशेब देण्याचे आव्हान दिले होते. सातपुते यांच्या या आव्हानाला आता आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
प्रचार सभेत बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, घरातून चांगले संस्कार मिळावे लागतात, ते तुमच्याकडे नाहीत, ८३ वर्षांचे असूनही पवार साहेब व माझे वडील महाराष्ट्र पिंजून काढतात, तुम्हाला लढायचं असेल तर माझ्याशी लढा, मी उभी आहे, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता राम सातपुतेंना सुनावलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वडाळा येथील संवाद बैठकीत त्या बोलत होत्या. मी १५ वर्षे उगीच निवडून आले का, असा प्रश्न विरोधकांना विचारत तुमची लेक लोकशाही, शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी लढतेय असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
माझे उत्तर तालुक्याशी १९७८ पासून संबंध आहेत, मला पाच वेळा तुम्ही निवडून दिले, नान्नजचे गंगाराम घोडके ताकदीने काम करायचे असे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. मोदी सरकारने लोकांचे प्रश्न बाजूला ठेवल्याचा आरोप करीत शरद पवार व मी वेगवेगळे झालो तरी आमचे नाते तुटले नाहीत, असे शिंदे म्हणाले.