सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी सोमवारी निवडणुकीतून माघार घेतल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता गायकवाड यांनी परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यावेळी त्यांना अडविणारे वंचितच्या जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतले.
दुसरीकडे माढ्यातून शेतकरी कामगार पक्षाचे अँड. सचिन देशमुख यांनी भूमिका बदलल्याने तिथे तिरंगी लढत होणार आहे. वेळ कमी असून निवडणुकीची तयारी झालेली नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणुकीतून बाहेर पडत असल्याचे देशमुख यांनी जाहीर केले. सोमवार, २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. सोमवारी दिवसभर महसूल भवनमध्ये मोठी गर्दी होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण ३२ उमेदवार होते. यापैकी ११ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता एकूण २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापुरात काँग्रेसचे प्रणिती शिंदे तसेच भाजपचे राम सातपुते यांच्यात थेट लढत असणार आहे. यांच्यासोबत आणखी १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार होते. यापैकी सहा जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नेते होते ठाण मांडून...
यंदा मोची समाजातील दोघांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरला होता. त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी मोची समाजाचे नेते संजय हेमगडी, देवेंद्र भंडारे, दिनेश म्हेत्रे, हणमंतू सायबोळ, प्रा. नरसिह आसादे हे महसूल भवनात दुपारी तीन वाजेपर्यंत ठाण मांडून होते. समाज बांधव रवी म्हेत्रे तसेच भारत कंदकुरे यांच्या माघारीसाठी यांनी प्रयत्न केले. यांच्यासोबत दत्तात्रय थोरात, राहुल बनसोडे यांच्याही माघारीसाठी त्यांनी प्रयत्न केले, अशी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यांच्यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, अॅड, मनीष गडदे, भाजपचे चन्नवीर चिंद्रे, विकास वाघमारे यांच्यासह काही नेते उपस्थित होते.
सोलापुरातून यांनी घेतली माघारराहुल गायकवाड, श्रीदेवी फुलारे, प्रमोद गायकवाड, रविकांत बनसोडे, दगडू घोडके, दत्तात्रय थोरात, राहुल बनसोडे, भारत कंदकुरे, मनोहर कोरे, रवी म्हेत्रे, राजशेखर कंदलगावकर असे एकूण ११ जण.
माढ्यातून यांची माघारसचिन देशमुख, शाहाजहान शेख, गणेश चौगुले, नागेश हुलगे, मनोज अनपट, रामचंद्र गायकवाड असे एकूण सहा जण.
दागिने घालून अर्ज मागे...फाटक्या साडीत अर्ज भरणाऱ्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यावेळी मात्र त्यांच्या अंगावर दागिने होते. पवार गटाचे प्रमोद गायकवाड हे देखील निवडणुकीतून बाहेर पडले आहेत.
चिन्हासाठी टाकली चिठ्ठीवंचितचे उमेदवार रमेश बारसकर यांनी एका चिन्हाची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्याकडे केली. या चिन्हासाठी दोघांकडून मागणी आली. त्यामुळे ठाकूर यांनी चिठ्ठी टाकून निर्णय घेतला. चिठ्ठी बारसकर यांच्या नावे निघाली. त्यामुळे हवे ते चिन्ह बारसकर यांना मिळाले.
भाजपला फायदा नको म्हणून मागे : गायकवाड
संविधान वाचवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज मागे घेतला. या उमेदवारीमुळे भाजपचा खासदार सोलापुरातून दिल्लीत गेला असता. माझ्या हातात बंदूक दिली असली तरी त्यात गोळ्याच नव्हत्या. काही कार्यकर्त्यांची फळी स्वार्थी असून त्यात काहीजण ब्रोकर आहेत, असे राहुल गायकवाड यांनी एका व्हीडीओत म्हटले आहेत.
पक्षाचे चिन्ह घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो असता उमेदवार गायकवाड अर्ज मागे घेताहेत हे पाहून त्यांना अडविले. प्रकाश आंबेडकर यांच्याशी अगोदर फोनवर बोला असे आम्ही सांगत होतो. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांनी आम्हाला काही काळ ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले. - चंद्रकांत मडिखांबे, जिल्हाध्यक्ष, वंचित
सोलापुरातील उमेदवारकाँग्रेस प्रणिती शिंदे, भाजप राम सातपुते, बसपा बबलू गायकवाड, बहुजन मुक्ती पार्टी प्रा.डॉ. अर्जुन ओव्हळ, बळीराजा पार्टी कुमार लोंडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया युगंधर ठोकळे, अपक्ष आण्णा मस्के, आतिश बनसोडे, कृष्णा भिसे, तुकाराम गायकवाड, परमेश्वर गेजगे, भन्ते नागमूर्ती कुरणे, विक्रम कसबे, विजयकुमार उघडे, रमेश शिखरे, शिवाजी सोनवणे, श्रीविद्यादुगर्गादेवी कुरणे, सचिन मस्के, सुदर्शन खंदारे, सुनीलकुमार शिंदे, डॉ. सुभाष गायकवाड आदी
माढ्यातील उमेदवारशरद पवार गट धैर्यशील मोहिते-पाटील, भाजप रणजितसिंह नाईक-निंबाळकर, वंचित रमेश बारसकर, बसपा स्वरूपकुमार जानकर, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक भारत आवारे, भारतीय जवान किसान पार्टी गोपाळ जाधव, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी रामचंद्र घुटूकडे, स्वराज्य सेना सत्यवान ओबासे, आरपीआय संतोष बिचुकले, अपक्ष अनिल शेंडगे, अमोल करडे, अशोक वाघमोडे, काशिनाथ देवकाते, किरण साठे, संदीप खरात, गिरीश शेटे, धनाजी मस्के, नवनाथ मदने, नानासाहेब यादव, नारायण काळेल, नंदू मोरे, भाऊसाहेब लिगाडे, रोहित मोरे, रशिद शेख, विनोद सीतापुरे, सचिन जोरे, गणेश सरडे, राहुल सावंत, सीताराम रणदिवे, हणमंत माने, लक्ष्मण हाके.