आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर लाेकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांना मोठे मताधिक्क मिळत आहे. प्रणिती शिंदे विजयाच्या जवळ पोहोचल्या आहेत. अधिकृत विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली नसली तरी विजयाची खात्रीने प्रणिती शिंदे यांची आई उज्वलाताई शिंदे यांनी माध्यमांना विजयी प्रतिक्रिया दिली. वडिलांची पुण्याई अन् तिची प्रचंड मेहनत हेच तिच्या विजयाचे श्रेय असल्याचे उज्वलाताई शिंदे म्हणाल्या.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आ. प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढविली. भाजपाचे आमदार राम सातपुते व आमदार प्रणिती शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली. १८ व्या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांना ४ लाख ७३ हजार २७३ मते मिळाली असून राम सातपुते यांना ४ लाख ३२ हजार ५३७ मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे यांना ४० हजार ७३६ मताचे मताधिक्क आहे. १८ वी, १९ वी, २० वी अन्य फेरीचे मतमोजणी सुरू आहेत. लवकरच अंतिम निकाल हाती येणार आहे.
दरम्यान, विजयाबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांनी माध्यमांना विजयी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी विजयी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करणार्यांना जनतेने मोठा धडा शिकविला आहे. मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे शिंदे यांनी आभार मानले आहेत. तर उज्वलाताई शिंदे यांनी प्रणितीने घेतलेली प्रचंड मेहनत, वडिलांची पुण्याई तिच्या यशाच्या कामी आल्याचे सांगितले.