सोलापूर : काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी उद्या सोमवार दि. २५ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, शिंदे यांची पदयात्रा सकाळी हुतात्मा चौकातून; तर आंबेडकरांची रॅली न्यू बुधवार पेठेतून निघणार आहे. महास्वामीजी दुपारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सकाळी साडेआठ वाजता हुतात्मा चौकातील चार हुतात्मा पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पदयात्रा निघणार आहे. या पदयात्रेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी, आमदार व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री सिद्धेश्वर मंदिर, मार्कंडेय मंदिर, पंचकट्टामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढण्यात येणार आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सिद्धेश्वर महास्वामी हे मात्र प्रमुख पदाधिकाºयांसह दुपारी दोन वाजता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत.
तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते व उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची रॅली न्यू बुधवारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहे. ही रॅली सम्राट चौक, शिवाजी चौक, बाळीवेस, मधला मारूती, विजापूरवेसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येईल. रॅलीमध्ये मोटरसायकली,रिक्षांचा सहभाग राहणार आहे. ढोल ताशे व हलगीच्या गजरात पदयात्रा निघणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे परवानग्या घेण्यात आल्या आहेत. पदयात्रेत वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र कमांडो तसेच समता सैनिक दलाचे सैनिक कार्यरत राहणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी वकिलांशी सल्लामसलत करून सर्व दाखले व इतर माहिती संकलित केली आहे. ऐनवेळी गडबड होऊन धोका टाळण्यासाठी डमी उमेदवारांचे अर्ज तयार ठेवण्यात आले आहेत. एकाच दिवशी तासाभराच्या अंतराने तिन्ही पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याने पोलीस यंत्रणेवर ताण पडणार आहे. त्यामुळे काँग्रेस व बहुजन वंचित आघाडीला वेगवेगळ्या वेळांमध्ये पदयात्रा काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरताना गोंधळ होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारासोबत अनुमोदक व फक्त ठराविक कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. गर्दीच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व पूनम गेटवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
उन्हाचा कडाका म्हणून थेट अर्ज- भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज हे निवडक पदाधिक़ाºयांसमवेत दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज भरणार आहेत. उन्हाचा कडाका असल्याने कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी सांगितले. तत्पूर्वी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून, यासाठी जिल्ह्यातून कार्यकर्ते व पदाधिकारी येणार आहेत.
राहू काळ टाळण्याचा प्रयत्न- मंगळवार २६ मार्च हा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असला तरी सोमवारी रंगपंचमीचा मुहूर्त प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी साधला आहे. सकाळी पावणेदहा वाजेपर्यंत राहूकाळ असल्याने त्यापुढेच उमेदवारी दाखल करण्यावर भर देण्यात आला आहे. ११.३0 वा. सुशीलकुमार शिंदे यांचा तर त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि दुपारी दोननंतर डॉ. जयसिद्धेश्वर महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पदयात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
- - निवडणुकीनिमित्त सोमवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विविध पक्षांच्या तीन पदयात्रा निघणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर तर भाजपकडून जय शिवाचार्य सिद्धेश्वर महाराज यांची पदयात्रा निघणार आहे.
- - प्रत्येक पदयात्रेसाठी दोन पोलीस निरीक्षक, चार फौजदार आणि ३0 पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त देण्यात आला आहे.
- - हा बंदोबस्त पदयात्रा सुरू झाल्यापासून सोबत राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा बंदोबस्त असणार आहे. पदयात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच गोंधळ होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.