सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत’ने चिऊताईच्या संवर्धनासाठी, त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ‘घर तेथे घरटी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या हाकेला पक्षीप्रेमी सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिमण्यांचा वावर कमी झालाय यासाठी काय करायला हवं, हक्कानं सांगा आम्ही तयार आहोत अशी आश्वासक प्रतिक्रियाही नोंदवली आहे.
लोकमत आणि निसर्ग माझा सखा परिवारानं दिलेल्या हाकेला सोलापूरकरांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता लोकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेली जाणीवजागृती दिसून आली. लोकमतने याबद्दल घेतलेला पुढाकार निश्चितच चिमण्यांची संख्या वाढीसाठी पोषक ठरेल अशी मतं या निमित्ताने मांडली जात आहेत.
मूळत: जिकडे तिकडे लहान मोठी सिमेंट-काँक्रीटची गुळगुळीत घरे.... ही घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड यामुळे चिमण्यांसह अन्य पक्ष्यांचाही वावर कमी होताना आपण पाहतो. खरंतर चिमण्यांच्या अधिवासासाठी हवा असतो एक सुरक्षित कोपरा. कृत्रिम घरट्यांच्या माध्यमातून आपण चिमण्यांना कोपरा उपलब्ध करून देण्याची ही संकल्पना आहे. ही घरटी आपण विविध आकाराच्या आणि तेही टाकाऊ वस्तूंपासून बनवू शकतो.
स्क्रॅपयार्डमध्ये किंवा रस्त्यांवर इतरत्र पडलेल्या पुट्ट्याचे लहान-मोठे डबे आपल्याला यासाठी वापरता येणार आहेत. यासाठी प्रशिक्षण शिबिरातून जागृती व्हावी अशाही प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. लोकमतने केलेल्या आवाहनानुसार अनेकांनी घरट्यांसाठी मागणीही नोंदवली आहे. काहींनी घरटी कशी बांधायची, कुठे बांधायची, त्यांची काय काळजी घ्यायची यासह काहींनी चिमण्यांच्या अधिवासासाठी घरटी बसवल्याचेही सांगितले. एकूणच चिऊताईच्या या घरट्यांसाठी शहरातील गल्लीबोळातही चर्चा सुरु झाल्याचे दिसू लागले आहे.