काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांची नव्हे तर कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 10:20 AM2019-04-17T10:20:23+5:302019-04-17T10:21:30+5:30

केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर टिका

solapur loksabha election nitin gadkari congress | काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांची नव्हे तर कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली

काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांची नव्हे तर कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली

googlenewsNext
ठळक मुद्दे- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी याच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळावा- मी विधान परिषदेत होतो तेव्हा शिंदे आणि देशमुखांना पाहून म्हणायचो की, एक हसमुख आणि दुसरे देशमुख. दोघांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला - गडकरी

सोलापूर : पंडित जवाहरलाल नेहरू ते राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी गरिबी हटावचा नारा दिला, पण काँग्रेसच्या काळात सर्वसामान्य माणसांची नव्हे तर कार्यकर्ते, नेते, चेलेचपाटे आणि चमच्यांची गरिबी हटली. त्याबद्दल काँग्रेसला दाद द्यावी लागेल, अशी टीका केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी पार्क स्टेडियमवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. 

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार विकास महात्मे, महापौर शोभा बनशेट्टी, डॉ. जयसिद्धेश्वर, आमदार प्रशांत परिचारक, अविनाश महागावकर, शिवसेना नेते शिवाजी सावंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रा. अशोक निंबर्गी, नरसिंग मेंगजी, इंद्रजित पवार, श्रीमंत बंडगर, शिवशरण पाटील आदी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या काळात गरिबी हटली नाही. पण काँग्रेसच्या काळात कोणाला मेडिकल कॉलेज, कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कोणाला डी.एड. कॉलेज मिळालं. या कॉलेजला प्रवेश देण्यासाठी त्यांनी पैसे वसूल केले. कोणाला प्राथमिक शाळा मिळाली. शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेस-राष्ट्रवादीची रोजगार हमी, अशी परिस्थिती राहिली. 
गडकरी म्हणाले की, मी विधान परिषदेत होतो तेव्हा शिंदे आणि देशमुखांना पाहून म्हणायचो की, एक हसमुख आणि दुसरे देशमुख. दोघांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला. काँग्रेसला ६० वर्षे देश चालविण्याची संधी मिळाली, पण त्यांनी देशाची बेइमानी आणि विश्वासघात केला. याच काँग्रेस पक्षाने ७० हजार कोटी रुपयांची विमानं खरेदी केली, पण विदर्भातील, सोलापुरातील शेतकºयांच्या पाण्याच्या योजना पूर्ण केल्या नाहीत. 

दोन्ही काँग्रेसची मुलं मांडीवर खेळायला लागली 
- सोलापूर जिल्ह्यातील टेंभू-म्हैसाळ योजनेचा उल्लेख करून गडकरी म्हणाले, काँग्रेस सरकारने १० टक्के ठेकेदारांकडून अ‍ॅडव्हान्स घेऊन सिंचनाची कंत्राटं दिली. १५ वर्षांनंतर टेंभू-म्हैसाळची योजना बंद पडली होती. लोखंडाच्या पाईपला गंज चढला होता. कंत्राटदार पळून गेले होते. पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचं. लग्न यांनी केलं. मुलं यांना झाली. हे पळून गेले आणि त्यांची मुलं देवेंद्रच्या मांडीवर बाबा बाबा म्हणून खेळायला लागली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या मुलांना रोजगार कसा मिळेल, अशी चिंता आहे. 

सोलापुरात हवेतून जाणारी बस येऊ शकते
- गडकरी म्हणाले, नागपूरमध्ये हवेतून चाललेल्या बस आणल्या आहेत. रोप-वे, केबल कार यांसारख्या २८ कंपन्या यासाठी संयुक्तपणे काम करतात. या बसमध्ये २६० लोक बसू शकतात. सोलापूर महापालिकेने यासंदर्भात ठराव करावा. महापौरांनी यासंदर्भात आमदार, नगरसेवक यांना माहिती सांगावी. महापालिका निविदा न काढताही या कामाचा आराखडा तयार करू शकते. मेट्रोचे ट्रॅक टाकण्यासाठी प्रतिकिलोमीटर ३५० कोटी खर्च येतो तर हवाई बसच्या ट्रॅकसाठी प्रतिकिलोमीटर ५० कोटींपेक्षा कमी खर्च येतो, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: solapur loksabha election nitin gadkari congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.