सोलापूर : एक जानेवारीपासून टॉवेल आणि चादरीच्या किमतीवर एकूण बारा टक्के जीएसटी लागणार आहे. पूर्वी फक्त पाच टक्के जीएसटी होता. वाढीव सात टक्के जीएसटी विरोधात यंत्रमाग उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून याबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. जीएसटी कमी न झाल्यास सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सोलापुरातील यंत्रमाग उद्योजकांनी दिला आहे.
अधिक माहिती देताना सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी सांगितले, वाढीव जीएसटीला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर समिती गठित करण्यात आली आहे. समितीद्वारे सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. जीएसटी कौन्सिल तसेच समिती प्रतिनिधींच्या बैठका झाल्या असून बैठकीत सकारात्मक सूर निघत नसल्याने देशभरातील उद्योजक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
एक जानेवारीपासून कापडावर १२ टक्के जीएसटी लागू झाल्याने देशभरातील उद्योजक चिंतेत आहेत. वाढीव जीएसटीचा फटका सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योजकांना बसणार आहे. मागील दीड वर्षात सुताच्या दरात शंभर रुपयांची वाढ झाल्याने टॉवेल आणि चादरीच्या किमतीत भरीव वाढ झाली आहे. किमती वाढल्याने त्याचा परिणाम येथील उत्पादनावर झाला आहे. अशात पुन्हा १२ टक्के जीएसटीचा आग्रह कशासाठी, असा सवाल यंत्रमाग उद्योजकांनी केला आहे.
सोळा लाख कामगारांना फटका बसू शकतो
सोलापूर, मालेगाव, भिवंडी, इचलकरंजी तसेच विटा या ठिकाणी टेक्स्टाईल उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात एकूण सतरा ते अठरा लाख यंत्रमाग आहेत. या उद्योगात तब्बल १६ लाख कामगार कार्यरत आहेत. वाढीव जीएसटीमुळे यंत्रमाग उद्योग अडचणीत येणार आहे. त्याचा थेट परिणाम राज्यातील साेळा लाख कामगारांना बसू शकतो.