- शीतलकुमार कांबळेसोलापूर - वाढलेले केस, अंगावर सतत एकच शर्ट, झुडपामध्ये राहण्याचे ठिकाण, कुणी बोलले तर अंगावर येणारा असा मेहबूब मुर्तुज हा तरुण सोलापूर शहरात पाच ते सहा वर्षांपासून राहात होता. गुजरातमधील जामनगर येथून वयाच्या २२ वर्षी हरवलेला हा तरुण ३५ व्या वर्षी म्हणजेच १३ वर्षानंतर आपल्या घरी पोहोचला. सामाजीक संस्थांच्या मदतीने मेहबूबचे घर शोधण्यात आले.
गुजरातमधील जामनगर येथून महेबूब हा भटकत सोलापुरात आला होता. संभव फाऊंडेशनचे अध्यक्ष अतीश सिरसट यांनी अहमदनगर येथील स्नेह मनोयात्री प्रकल्प महेबूबला उपचारासाठी पाठविले. तिथे त्याच्यावर तीन महिने उपचार करण्यात आले. त्यानंतर श्रद्धा रिहॅबीलीटेशन सेंटरकडून मेहबूबच्या घरच्यांचा शोध घेतला. १३ वर्षानंतर संभव फांउडेशनच्या प्रयत्नामुळे मोहबूब आपल्या घरी परतला. मेहबूब यांना एक भाऊ व एक बहिण असून ते देखील आनंदी झाले.
कित्येक वर्षे केसांच्या वाढलेल्या जटा, दाढी, मळकटलेल्या, फाटलेल्या कपड्यात फिरणाऱ्या मनोरूग्ण मेहबूबला पाहून बिथरलो होतो. त्याच्या चेहऱ्यावरचा राग अन् रागातून आश्वासक झालेला चेहरा पाहून मला धैर्य आलं. डॉ भरत वाटवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मेहबूबवर चांगले उपचार झाले. तो बरा होऊन आपल्या मूळगावी पोहचला. तेरा वर्षाच्या भटकंतीला कुटुंबाच्या आनंदअश्रूने थांबा मिळाला, अशी प्रतिक्रिया अतीश शिरसट यांनी दिली.