- काशिनाथ वाघमारे सोलापूर - माढा तालुक्यातील बारलोणी ग्रामपंचायतीत गुरुवारी, १९ ऑक्टोबर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा निवडणुका व नेत्यांना गावबंदी करण्याचा ठराव एकमुखाने करण्यात आला आहे. असाच ठराव वडाचीवाडी आणि लव्हेतही करण्यात आला आहे.
बारलोणी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सदस्यांच्या अगामी येणा-या सर्व निवडणुकांवर व मतदानावर बहिष्कार, तसेच बारलोणी गावात सर्वपक्षीय नेते, पुढारी व राजकीय सभांना बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सूचक म्हणून अंकुश लोंढे व अनुमोदक सदाशिव शेलार यांनी स्वाक्षरी केली. यावेळी सरपंच नवनाथ गपाटे व इतर सदस्य उपस्थित होते. याबाबत येणा-या काही दिवसांतच बारलोणी गावाच्या वेशीसमोर आगामी निवडणुका, मतदान बहिष्कार व सर्वपक्षीय नेते मंडळींना गावबंदी असल्याचा मोठा फलक लावण्यात येणार आहे.
वडाचीवाडी गावाचा ठराव तर लव्हे गावचा फोटो व्हायरलवडाचीवाडी (ता. माढा) ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी आगामी निवडणुकीत व मतदानावर बहिष्कार व पुढाऱ्यांना गावबंदीचा ठराव केला आहे, तर तालुक्यातील लव्हे येथेही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना गावबंदी केल्याचा फलक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रत्यक्षात गावात असा फलक दिसत नाही मात्र काही तरुणांनी सोशल मीडियावर तसा फलक दाखवत आहेत.