सोलापूर : महाराष्ट्र राज्य निर्मिती, पारेषण, वितरण व होल्डिंग कंपनी च्या कर्मचारी, अभियंते, अधिकाऱ्यांना १ एप्रिल २०२३ पासून देय असलेल्या वेतनवाढ करार ऊर्जामंत्र्याच्या बैठकीत मूळ वेतनात समाधानकारक वाढ न मिळाल्याने प्रलंबित आहे. ज्यामुळे राज्यातील होल्डिंग कंपनीसह तीनही वीज कंपन्यातील कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र असल्याने कृती समितीतील सहा संघटनेच्यावतीने सोमवारी सोलापूरमहावितरण कार्यालय, जुनी मिल कंपाऊंड समोर द्वार सभा झाली.
या द्वारसभेस विजयकुमार राकले, विलास कोले, पोताजी जाधव, नागनाथ गयाळे, तानाजी चटके यांनी संबोधित केले. पहिल्या टप्प्यात २४ जून २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व वीज कंपन्यांच्या विभागीय कार्यालय, वीज निर्मिती केंद्रे व जिल्हा मुख्यालयांसमोर भव्य द्वार सभा घेऊन निदर्शने करणे, २८ जून २०२४ रोजी परीमंडल, झोन व पॉवर स्टेशनसमोर व्दारसभा, ९ जुलै २०२४ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप, निर्णय न झाल्यास ९ जुलै २०२४ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कृती समितीतील प्रमुख सहा संघटनांनी घेतलेला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ, सबर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सहभागी होत्या. या द्वार सभेस सुनील गायकवाड, विकास काटकर, संजय भोसले, नजीर मुजावर, संजय सुरवसे, विशाल कोरे,शेखर होले,सुनील काळे यांच्यासह महिला पदाधिकारी व सभासद स्वाती बरबडे ,कल्पना माने,स्वाती परदेशी, गौरी शिवगुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित होते.