सोलापूर - श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात गुरुवारी नवी घडामोड झाली. माजी आमदार दिलीप माने यांना सहकार्य करा असा फोन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना केला. त्यावर विद्यमान सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी मागे ठरल्याप्रमाणे जितेंद्र साठे किंवा बाळासाहेब शेळके यांना सभापती करा मी सहकार्य करतो, असे सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि बळीराम साठे यांनी केली होती. देशमुख यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून संचालक मंडळाचे बैठकांचे गुपित बैठक सत्र सुरू आहे. गुरुवारी सकाळी देशमुख विरोधी गटाची बैठक झाली. या बैठकीदरम्यान काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना फोन केला. पवारांकडून यावेळी प्रतिसाद आला नाही. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना आमदार देशमुख यांच्याकडून फोन आला. यानंतर सुरू असलेल्या बैठकीला साठे यांनी हजेरी लावली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला. माने यांना सहकार्य करा असा निरोप साठे यांना देण्यात आला. यावर आमदार देशमुख यांनी ठरलेला नवा प्रस्ताव सादर केला. यावर शुक्रवारी विचारमंथन होणार आहे.
मी सभापती पदासाठी इच्छुक नाही. कोणाला सभापती करायचे ते नेतेमंडळींनी ठरवावे. सभापती व उपसभापतींनी राजीनामा द्यावा की नको हा निर्णय ते व नेतेच घेतील.
- दिलीप माने, माजी चेअरमन, बाजार समिती