सोलापूर : कांद्याचा दर अचानकपणे कोसळल्यामुळे राज्य शासनाने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोलापूर बाजार समितीत दि. ३ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे, अशी माहिती उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी दिली.
राज्यातील सरकारी व खाजगी बाजार समितीत १ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक बाजार समितीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बाजार समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. जिल्हा उपनिबंधक मार्फत राज्य शासनाकडे अनुदानासाठी अहवाल देण्यात येणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवार, दि. ३ एप्रिलपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे. त्यासाठी बाजार समितीच्यावतीने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दि. २० एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. मुदत संपल्यावर दाखल होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कांद्याची नोंद असणे आवश्यक आहे. त्यासोबत आधार कार्ड बाजार समितीतील कांदापट्टी देणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले.