सोलापूर : महापौर म्हणून निवड झाल्यावर शहराला वेळेवर, पुरेशा दाबाने स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा निश्चय केला आणि वर्षभरात त्यादृष्टीने काम सुरू केले आहे, अशी प्र्रतिक्रिया महापौर शोभा बनशेट्टी यांनी व्यक्त केली.
गतवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिनी शोभा बनशेट्टी यांची महापौरपदी निवड झाली होती. त्यांच्या कारकिर्दीला वर्ष झाले. त्यानिमित्त संवाद साधताना वर्षभरात केलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. शहराला दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी उजनी धरणातून आणखी एक समांतर जलवाहिनी टाकण्याचा विचार केला आणि त्यादृष्टीने योजना तयार केली.
आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबत नियोजन करून समांतर दुहेरी जलवाहिनीची योजना साकार करण्यासाठी ६९२ कोटींचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या जलवाहिनीसाठी शासन निधी देण्याचेही मान्य केले आहे. एनटीपीसीकडून मिळणारे २५० कोटी, स्मार्ट सिटी योजनेतील २०० कोटी व उर्वरित शासन अनुदानातून ही जलवाहिनी साकारली जाणार आहे.
त्याचबरोबर शहरात केंद्रीय योजनेतून बांधलेल्या सहा नवीन टाक्या केवळ जलवाहिनीची जोड नसल्याने बंद होत्या. आसरा पुलाजवळील रेल्वे रुळाखालून जलवाहिनी टाकण्याचे काम कित्येक वर्षांपासून रखडले होते. हे काम मार्गी लावण्यात यश आले आहे. त्यामुळे जुळे सोलापुरातील उंचावरील टाकीशी या सहा टाक्या जोडल्या गेल्यावर हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. उजनीतील पाण्याची जादा आकारणी कमी करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
याचबरोबर स्मार्ट सिटीतील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. ई-टॉयलेटची संख्या वाढविण्याची शिफारस केली आहे. विजेचे बिल कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे नव्याने नियोजन करण्यात येत आहे. लक्ष्मी मार्केटचा विकास, संभाजी तलावाचे सुशोभीकरण, स्मार्ट रोड, पार्क स्टेडियम, हुतात्मा बागेचा विकास, कुस्ती आखाडा, होम मैदानाचा विकास आदी कामे मार्गी लावली जाणार आहेत.
शहर हागणदारी मुक्तीसाठी पाठपुरावा केला. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी गुंठेवारी व नोटरी खरेदीधारकांच्या समस्यांबाबत पाठपुरावा केला. आरोग्य सेवा सुधारणे व कर्मचाºयांच्या मागण्यांकडे लक्ष दिले. परिवहन सेवा सुधारण्यासाठी निधीबाबत पाठपुरावा केल्याचे समाधान वाटत असल्याचे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले.सक्षमपणे काम केल्याचे समाधान- कारकिर्दीला वर्ष झाले, काम करताना अडचणी आल्या, पण त्यावर सक्षमपणे मात करण्यात यशस्वी झाल्याचे समाधान आहे, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. त्यांच्यासोबत उपमहापौर शशिकला बत्तुल, महिला व बालकल्याण सभापती म्हणून अश्विनी चव्हाण यांना काम करण्याची संधी मिळाली