- काशिनाथ वाघमारे सोलापूर - गाईच्या दुधाला ४० रुपये भाव मिळावा यासाठी करमाळा तालुक्यातील केम गावामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी दूध डेअरीच्या चेअरमनला दुग्धाभिषेक करून अनोखे आंदोलन केले.
अनुदानापासून वंचित असणाऱ्या हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित अनुदान जमा करावे. ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ या दुधाला कोणत्याही अटी शर्ती न लावता अनुदान सहित ४० रुपये दर मिळावा, त्या शेतकऱ्यांना १ जुलै २०२३ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत फरक बिले द्यावीत. दूध उत्पादकांना कुठल्याही प्रकारच्या अटी-शर्ती न घालता ५ रुपये अनुदान द्यावे. प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी सतीश देशमुख यांनी माहितीच्या अधिकाराखालील प्रश्नाला उत्तर देताना दुधाचा प्रतिलिटर सरासरी उत्पादन खर्च ४२.३३ रुपये येतो, असे सांगितले आहे. दहा दिवसात कोणत्याही प्रकारचा दिलासा न दिल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा सरचिटणीस बापू नेते तळेकर यांनी दिला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अरुण लोंढे, चेअरमन कालिदास तळेकर, माऊली बीचीतकर, सचिन बिचीतकर, नागनाथ मंगवडे, सतीश देवकर, नीलेश गुटाल, गोकुळ तळेकर, सोमनाथ तळेकर, सतीश खानट, राहुल तळेकर उपस्थित होते.