जगन्नाथ हुक्केरी
सोलापूर : सकाळी नऊची वेळ.. मोटरसायकलला कॅन अडकावून सुसाट वेगात; पण तितक्याच संयमाने येत असलेले दूध विक्रेते अन् पशुपालक. छत्र्या लावून फॅट मोजण्यासाठी बसलेले फॅट मोजमाफक. खरेदीसाठी घाई करणारे डेअरीवाले. अशात घामाला दाम द्या... दोन रूपये कमी द्या... पण मापात पाप करू नका... असे पोटतिडकीने सांगणारे विक्रेते. पाणी किती घातला रे, असे ओरडणारे खरेदीदार, हे चित्र आहे रोज भरणाºया सोलापूरच्या उघड्या दूध बाजारातील.
शुक्रवार पेठेतील ‘फुटलेला’ दूध बाजार होम मैदानाच्या आपत्कालीन रस्त्यावर भरू लागला. त्यात पुन्हा तेथील बाजार हलविण्यासाठी स्थलांतराचे ‘मीठ’ पडले अन् बाजार सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील होम मैदानाच्या पैलतीरी भरू लागला. सकाळी नऊला सुरू होणाºया या बाजारात एकच धांदल असते. दूध विक्रेत्यांची तळमळ अन् खरेदीदारांची स्वस्ताईसाठी सुरू असलेली धडपड. माप मारू नका, असे म्हणणाºया पशुपालकांना डेअरीवाले सुनावतात, भेसळ करू नका, दूध नाशवंत पदार्थ आहे, यात जो कोणी फसवितो, तोही दुधासारखं नाशच होऊन जाईल, हे तत्त्वज्ञानही याच बाजारात पाहायला मिळते. मौल्यवान वस्तूंचे दर ठरविण्यात जितकी घासाघीस होते, तितकीच रेटारेटी दुधाच्या खरेदी-विक्रीतही होते़.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोलापूरच्या उघड्यावरील दूध बाजाराची चलती आहे. जागेच्या कारणावरून बाजार सतत फिरत राहिला, तरीही या बाजारावर मराठवाड्याबरोबरच कर्नाटकातील व्यापाºयांचा फारच मोह आहे. मराठवाड्यातील अणदूर, काटगाव, तामलवाडी यासह तुळजापूर तालुक्यातील बहुतांश गावांतील पशुपालक दूध विक्रीसाठी आणतात. कर्नाटकातील इंडी तालुका व भीमा नदीच्या पैलतीरी असलेल्या कर्नाटक सीमेवरील मोठ्या प्रमाणात दूध विक्रीसाठी शेतकरी येतात.
फक्त विक्रीसाठीच नव्हे तर खरेदीदारही मोठ्या प्रमाणात येत असतात. या बाजारातील दूध केवळ डेअरीसाठी जात नाही तर लग्न किंवा इतर समारंभासाठीही विकत घेणाºयांची संख्या अधिक आहे. या दुधाला निश्चित असे दर नाहीत. क्षणाक्षणाला याचा भाव कमी-अधिक होतो. दर फॅटवर ठरविले जातात. फॅट तपासासाठी तीन रूपये घेतात अन् दुधाचे फॅट ठरवून देतात, असे डेअरीचालक पांडुरंग क्षीरसागर यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण, उत्तर सोलापूर, सांगोला येथूनही दूध विक्रीसाठी येते. डेअरीला दूध घालण्यापेक्षा येथे दूध घातल्यास दर जास्त मिळत असल्याने पशुपालक या बाजाराकडे आकर्षित होत असल्याचे गणेश वाकसे यांनी सांगितले.
पदवीधरांचाही धंदा- दूध घेणारे डेअरीवाले हे उच्च शिक्षित आहेतच; पण विकणारेही तरूण आणि उच्च शिक्षित आहेत. दुग्ध व्यवसाय हा जोड धंदा म्हणून करणारे तुंगतचे उत्तरेश्वर रणदिवे, हगलूरचे पिंटू शिंदे , ‘दिवसभर इतरांकडे नोकरी करून आठ-दहा हजार मिळविण्यापेक्षा हा आमचा दुधाचा व्यवसाय कधीही चांगला’, असे ते सांगतात.
रसायनयुक्त दुधाची चौकशी व्हावी- उघड्या दूध बाजारात पशुपालक व विक्रेत्यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन काही व्यावसायिक रसायन व युरियायुक्त दूध विक्रीस आणत आहेत. यामुळे पशुपालकांच्या दूध दरावर परिणाम होत आहे. हे दूध आरोग्यास घातकही आहे. या बाजारात येणाºया अशा दुधाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही दूध विक्रेत्यांनी केली.
नासलेल्या दुधाचीही विक्री- दूध कधी ‘फुटेल’ याची शाश्वती नसते. नासलेले हे दूध सांडून द्यावे लागते. यामुळे नुकसानही कित्येकवेळा सोसावे लागते. पण अशा नासलेल्या दुधाचा फटका विक्रेते, पशुपालक, गवळ्यांना बसू नये, म्हणून काही ठराविक व्यापारी असे दूध खरेदी करतात. नासलेल्या दुधापासून दही, कलाकंद, ताक असे तत्सम पदार्थ बनविले जात असल्याचे एका गवळ्याने सांगितले.
संघटनाविना विक्रेते- दूध डेअरीची संघटना आहे. ते आपल्या अडचणीबाबत न्याय मागू शकतात. भांडू शकतात. पण आमच्यात एकी नाही. आमची संघटनाही नाही. यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही. आमच्या न्याय-मागण्यांसाठी संघटना करणार असल्याचे विनायक वाकसे यांनी सांगितले.