दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी चालक रणजित महादेव सुडके (रा. महमदाबाद-शेटफळ, ता. मंगळवेढा), सागर तानाजी मासाळ (रा. तपकिरी शेटफळ) व एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस शिपाई गणेश प्रभू सोलनकर हे मंगळवेढा पोलीस ठाण्याकडे नेमणुकीस होते. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४० वाजता शिरसी-गोणेवाडी मार्गावर लोक अदालतचे समन्स बजावण्यासाठी जात होते. शिरसी शिवारातील हॅटसन डेअरीजवळ आले असता तेथून अवैधरीत्या वाळू भरून बिगर नंबरचा पांढऱ्या रंगाचा टेम्पो जात होता. रस्त्यावर थांबलेले सपोलीस कर्मचारी आपल्यावर कायदेशीर कारवाई करतील या भीतीपोटी पोलीस शिपाई सोलनकर यांच्या अंगावर मोटारसायकलला घालून जोरदार धडक दिली. यात सोलनकर यांना गंभीर जखमी झाल्याचे जागीच ठार झाले. याबाबत गोणेवाडीचे पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास मंगळवेढ्याच्या डीवायएसपी राजश्री पाटील करीत आहेत. मयत सोलनकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे मूळ गाव बुरलेवाडी (ता. सांगोला) आहे.
या घटनेत तिघे आरोपी असून, हे तपकिरी शेटफळ येथील असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये एक अल्पवयीन आहे. हे वाहन माण नदीपात्रातून वाळू घेऊन जात होते. तालुक्यातील भीमा व माण नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने पोलीस प्रशासन व महसूल विभागाने कारवाईसाठी संयुक्त पथकेही नेमली होती. घटनेच्या अगोदर २४ तास बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाईही केली होती. १ सप्टेंबरपासून महसूल विभागाने सलग सोमवार ते रविवार या दरम्यान मंडल अधिकारी व तलाठी यांचीही पथके रात्रपाळीत कारवाईसाठी नेमली आहेत.
----
मंगळवेढ्याच्या इतिहासातील पहिली घटना
वाळू व्यवसायात मुबलक पैसा मिळत असल्यामुळे वाळू तस्करवाले या व्यवसायासाठी फोफावले आहेत. मुजोर वाळू तस्करांनी चक्क खाकी वर्दीला न जुमानता चक्क अंगावर वाळूचे वाहन घालून जीवे ठार मारल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. मंगळवेढ्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
----
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मृत पोलीस शिपाई सोलनकर यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात संध्याकाळी करण्यात आला. सायंकाळी ५.१५ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे व पोलीस कर्मचारी अंत्यविधीसाठी उपस्थित होते. ही दुर्दैवी घटना असून सोलनकर कुटुंबीयांच्या दु:खात संपूर्ण पोलीस दल सहभागी असल्याची भावना पोलीस अधीक्षक सातपुते यांनी व्यक्त केली.
-----
फोटो २५ गणेश सोलनकर/ २५मंगळवेढा
पोलीस गणेश सोलनकर यांच्या पार्थिवास हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देताना पोलीस.
250921\20210925_123139.jpg
गणेश सोलनकर मयत पोलीस