राकेश कदम
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतील अनेक ठेकेदार कंपन्यांवर महापालिका मेहेरबान झाल्याचे दिसत आहे. स्मार्ट रोड, उद्यान विकासाप्रमाणेच शहरातील पारंपरिक पथदिवे बदलून ‘एलईडी’ दिवे बसविण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. महापालिका आणि एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीत झालेल्या करारानुसार सहा महिन्यांत ४० हजार दिवे बसवायचे आहेत. मात्र चार महिन्यांत ७६०० एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. या गतीने गेल्यास काम पूर्ण व्हायला दीड ते दोन वर्षे लागतील, अशी टीका नगरसेवकांमधून होत आहे.
महापालिकेच्या वीज बिलात बचत करण्याच्या दृष्टीने एलईडी बल्ब बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महापालिका आणि ईईएसएल कंपनीमध्ये १० डिसेंबर २०१८ ला करार झाला. या करारानुसार ईईएसएल कंपनीने सहा महिन्यांत सुमारे ४० हजार एलईडी दिवे बसवायचे आहेत. करारनामा झाल्यानंतर पोलचे सर्वेक्षण, डीपीआर तयार करण्यात आला. सांगलीतील एका कंत्राटदारामार्फत प्रत्यक्ष दिवे बसविण्यास सुरुवात करण्यात आली. या कंपनीने पुन्हा आठ सहकंत्राटकार नेमले असून, त्यांनी गेल्या चार महिन्यांत ७६०० एलईडी बसविले आहेत. यातही केवळ प्रमुख रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
ईईएसएल कंपनीकडून एलईडी बल्बचा पुरवठा होता. या कंपनीकडे देशातील अनेक कंपन्यांची कामे आहेत. एकाच वेळी अनेक भागांत एलईडीचा पुरवठा सुरू आहे. सोलापुरात बल्ब उपलब्ध झाले की काम सुरू होते. एलईडी बल्ब येण्यास विलंब झाला की काम ठप्प होत असल्याचे मनपाच्या विद्युत विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे.
पोल सरळ नाहीत, अनेक दिवेही बंद - एलईडीच्या कामामुळे इतर पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती बंद आहे. शहरात आणि हद्दवाढ भागातील अनेक प्रभागात आजही अंधार आहे. एलईडीचे काम खासगी कंत्राटदार करतात. दुसरीकडे मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी ‘निवांत’ असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. रुपाभवानी चौक, दयानंद कॉलेज चौक ते गुरुनानक चौक या मार्गावर एलईडी बल्ब बसविले आहेत. अनेक ठिकाणचे पोल वाकडे आहेत तर एलईडी बंद आहेत. पोलच्या वायरी दुभाजकात आल्या आहेत. मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचाºयांनी किमान हे करुन घ्यायला हवे. विद्युत विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे या कामाचा बोजवारा उडू शकतो, असा आरोप नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी केला.
नव्या पोलची वर्कआॅर्डर आचारसंहितेत अडकली- एलईडीसोबत शहर आणि हद्दवाढ भागात नव्याने विजेचे पोल आणि वायरिंग करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून १५ कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. हे काम बजाज कंपनीला मिळाले आहे. आचारसंहितेमुळे वर्कआॅर्डर देण्यात आलेली नाही.
अधिकाºयांचा हलगर्जीपणाएलईडीचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेची दरमहा ५० लाख रुपयांची बचत होणार आहे. या कामाला उशीर झाल्यास महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होईल. ईईएसएल कंपनी करार पाळत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी. काम झेपत नसेल तर त्यांनी घ्यायलाच नको होते. विद्युत विभागातील अधिकाºयांनी हलगर्जीपणा सोडून या कामाचा पाठपुरावा केला तर शहरातील अंधार दूर होईल. - नागेश वल्याळ, नगरसेवक.
आम्ही पत्र दिलेईईएसएल कंपनीचे पहिले दोन महिने कामाच्या सर्वेक्षणात गेले. सर्वेक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. कामाची आम्हालाही कमी वाटते. याबाबत आम्ही कंपनीला पत्र पाठविले असून मुदतीत काम पूर्ण करावे, असे सांगितले आहे. - संदीप कारंजे, नगरअभियंता, मनपा.