सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अचानक धाड टाकली. या धाडीत गलिच्छ वस्ती सुधारणा विभागातील सहाय्यक अभियंत्यास १३ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले.
सुनिल लामकाने (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, सोलापूर) असे लाच घेतलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लामकाने यास ताब्यात घेऊन सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोलापूर महापालिकेच्या गलिच्छ वस्ती सुधारणा योजना विभागात ते कार्यरत होते, यापूर्वी झोन अधिकारी, पाणी पुरवठा विभागात त्यांनी काम केले आहे. यापुर्वीही त्याच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या मात्र त्याकडे त्याच्या वरिष्ठ अधिकारयांनी दुर्लक्ष केले होते. अनेक नागरिकांना त्याच्या कामाचा त्रास होत होता असेही सांगण्यात आले.