रवींद्र देशमुख, सोलापूर: शहराला महिनाभरापासून कधी काळे पाणी येते, कधी हिरवे तर कधी पिवळे. पाच-सहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्यामागे मनपा वीजपुरवठ्यातील व्यत्ययाचे कारण पुढे करुन महावितरणवर खापर फोडून मनपा हात वर करत आहे. मात्र महावितरणने या सर्व आरोपाचे खंडण केले आहे.
सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी उजनीधरणासह आठ ठिकाणी उच्चदाब वीज जोडण्या आहेत. गेल्या काही दिवसांत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांना जसा या अवकाळीचा फटका बसतो. तसाच तो वीज यंत्रणेलाही बसतो. ८ व ९ एप्रिलाही असाच तडाखा बसला. उजनी पाणीपुरवठा (भीमानगर) योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीवर वीज पडली. विजेच्या कडकडाटाने वीज खांबावरील इन्सुलेटर (चिमणी) फुटले. अशा आपत्कालिन परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अख्खी रात्र जागून काढली. खराब झालेले इन्सूलेटर बदलून वीज वाहिनी सुरु केली. या ठिकाणी मनपाकडे पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था नाही. ती असती तर पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु करुन झालेला बिघाड दुरुस्त करणे शक्य झाले असते. १९ एप्रिल रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत पर्यायी वाहिनी टाकण्याची महावितरणची सूचना आयुक्तांनी मान्य केली आहे.
१६ एप्रिल रोजी पाकणी पाणी पुरवठा योजनेच्या ३३ केव्ही वाहिनीचे इन्सुलेटर विजेच्या कडकडांमुळे फुटले. यावेळी १ तास १० मिनिटे वीजपुरवठा बंद होतो. ८, ९ व १६ तारखेला वीजपुरवठा खंडित झाला. मात्र त्यामागील कारण नैसर्गिक आपत्ती आहे. त्यासाठी महावितरण किंवा यंत्रणा थेट जबाबदार नाही. हे मोठे बिघाड वगळता इतर वेळी ५ मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या ट्रिपींग आल्या आहेत. ७ फेब्रुवारीला मनपाने भवानी पेठ पंप हाऊस फिडरवर अंतर्गत देखभाल दुरुस्तीसाठी १ तास ३६ मिनिटे वीजपुरवठा बंद करुन घेतला. मनपानेही त्यांच्या वीज यंत्रणेची नियमित देखभाल करुन वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशी महावितरणची अपेक्षा आहे.