सोलापूर: सोलापूर शहरामधील कुमठा नाका परिसरामध्ये कुष्ठरोग वसाहत आहे. या वसाहतीमध्ये कुष्ठरोग रुग्ण मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. सदर रुग्णांना दरमहा १ हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येत होते. परंतु सद्य:स्थितीत ते बंद करण्यात आले आहे. यामुळे त्यांना दैनंदिन उपजीविका भागविणे, उदरनिर्वाह करण्याकरिता व औषधोपचार यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे कुष्ठरोग्यांचे बंद असलेले प्रति महिना १ हजार रुपये अर्थसाहाय्य लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, आ. प्रणिती शिंदे यांच्या पुढाकाराने शिष्टमंडळासमवेत आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे बैठक झाली. या बैठकीस महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोलापुरातील अक्क्लकोट रोड, औद्योगिक वसाहत येथे रस्ता, पाणी, स्ट्रीट लाइट, फायर ब्रिगेड, काट्याची झाडे झुडपे, मच्छर, घंटागाडी, खुली जागा, ड्रेनेज लाइन इ. विविध समस्या असल्यामुळे कारखानदारांना अडचणी येत असल्याचे आयुक्तांच्या निर्दशनास आणून दिले.
शहराला, नागरिकांना एक दिवसाआड पाणी द्या... -मुबलक पाणीसाठा असतानाही सोलापूर शहरात ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहराच्या पाणी पुरवठा वितरण केंद्रामध्ये शहरास एक दिवसाआड पाणी उपलब्ध होत असताना नियोजनाअभावी शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळण्याकरिताचे सूक्ष्म नियोजन करावे, अशीही मागणी आ. शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे.