सोलापूर :महापालिकेने जप्त केलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या १७ बसच्या मूल्यांकनाचे काम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाºयांनी सुरू केले आहे. या बसच्या मूळ कागदपत्रांसाठी महापालिकेकडून आरटीओंकडे शुल्क भरण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी शुक्रवारी दिली.
बेकायदेशीर बांधकामप्रकरणी महापालिकेने केगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड इन्स्टिट्यूटला ८ कोटी ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सिंहगडने जवळपास ५ कोटी रुपयांचा भरणा केला आहे.
उर्वरित ३ कोटी रुपये भरण्यास विलंब लागत असल्याने महापालिकेने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या १७ बस जप्त केल्या आहेत. या बसचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्रीनिवास मूर्ती, आशिष पराशर यांनी महापालिका आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याशी चर्चा केली.
मनपा शुल्क भरणार- बसच्या मूल्यांकनासाठी मूळ कागदपत्रे आवश्यक आहेत. आरटीओंकडून आरसी बुक मिळेल. परंतु, त्यासाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क भरावे लागेल, असे सांगण्यात आले. महापालिका प्रशासनाने हे शुल्क भरण्याची तयारी दाखविली. पुढील आठवड्यात मूल्यांकन पूर्ण होईल. या बसवर बँकेचा बोजा असला तरी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन कारवाई केली जाईल, असेही ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.