सोलापूर : शहरातील रस्ते, फूटपाथवर अनधिकृतपणे वाहने दुरुस्तीची कामे केली जातात. जुनी वाहने रस्त्यावर, मोकळ्या जागेत टाकली जातात. ही वाहने महापालिका ताब्यात घेणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाकडे सभागृहाकडे पाठविला आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा २० जानेवारी रोजी होणार आहे. या सभेसाठी प्रशासनाने काही महत्त्वाचे प्रस्ताव सभागृहाकडे पाठविले होते. शहरात पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून नालेदुरुस्तीची कामे करण्याबाबत प्रशासनाने पाठवलेला प्रस्ताव सभेच्या पटलावर घेण्यात आलेला नाही. इतर प्रस्ताव घेण्यात आले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या जागा, रस्ते, सार्वजनिक स्थळे, खुल्या जागांवर पडीक व बेवारस वाहने ठेवली जातात. या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. कचरा साठून राहतो. ही वाहने विभागीय अधिकाऱ्यांमार्फत ताब्यात घेण्याची कारवाई करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. यावर सभागृह निर्णय घेणार आहे.
महापालिकेकडून शहरातील दिव्यांग बांधवांना मदत निधी दिला जाते. जानेवारी २०२० ते मार्च २०२० या कालावधीत ३१४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापुढेही दिव्यांगांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन दिव्यांगांनाही या योजनेचा लाभ देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. यासाठी आवश्यक असलेल्या जादा खर्चाच्या तरतुदीचा प्रस्ताव सभागृहाकडे पाठवण्यात आला आहे.
बोगद्यातील घाणीकडे दुर्लक्ष, आता नामकरणाचा प्रस्ताव
मजरेवाडी येथे रेल्वेने अंडर पास बनविला आहे. या बोगद्यामध्ये परिसरातील घरांचे पाणी सोडले जाते. सध्या बोगद्यामध्ये घाण पाणी साठले आहे. त्यामुळे पायी जाता येत नाही. वाहनचालकांनाही कसरत करावी लागते. हे घाण पाणी रोखण्यात यावे अशी मागणी मजरेवाडी भागातील नागरिक अनेक दिवसांपासून करीत आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष झाले आहे. या बोगद्याच्या नामकरणाचा सभासद प्रस्ताव मात्र सभागृहाकडे पाठविण्यात आला आहे.