लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : मनपा परिवहनच्या (एसएमटी) उत्पन्नात अंदाजपत्रकात धरलेल्या गृहीतकापेक्षा १० कोटींनी उत्पन्न कमी आले आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात बरीच कपात करण्यावर भर देण्यात आला आहे. मनपाच्या अंदाजपत्रकासारखी परिवहनच्या अंदाजपत्रकाची स्थिती झाली आहे. सन २०१७-१८ साठी परिवहनचे ८३ कोटींचे अंदाजपत्रक मांडण्यात आले होते. यात ९० बस मार्गावर धावणार हे गृहीत धरून उत्पन्न व खर्चाची आकडेमोड करण्यात आली होती. पण चेसीक्रॅक समस्यामुळे मोठ्या बस धक्क्याला लागल्या. त्यामुळे मार्गावर फक्त ३७ बस धावू लागल्या. यामुळे उत्पन्नात बरीच तूट आली. या अंदाजपत्रकात बसच्या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न १६ कोटी गृहीत धरण्यात आले होते. पण प्रत्यक्षात जानेवारीच्या मध्यापर्यंत बस व्यवहारातून केवळ ६ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. १0 कोटींनी उत्पन्नात तूट आलेली आहे. परिवहन व्यवस्थापकांचा पदभार सहायक आयुक्त अभिजित हराळे यांच्याकडे गेल्यावर जुन्या बस दुरुस्तीतून सध्या ६० बस मार्गावर काढण्यात यश आले आहे. चालू वर्षी उत्पन्न कमी व तोटा वाढत गेल्याने वेतनाची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. त्यामुळे कर्मचाºयांची मानसिकता बिघडत गेली. आता दुरुस्तीनंतर जादा बस ताफ्यात आल्या तरी चालकांअभावी बस डेपोत थांबून आहेत. -------------------अंदाजपत्रकात करणार कपातसन २०१८-१९ चे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. या वेळेस ७५ बस मार्गावर धावणार, असे गृहीत धरून उत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार केले जाणार असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी दिली. गतवर्षी एका बसचे दरदिवशीचे उत्पन्न ७ हजार रुपये गृहीत धरण्यात आले होते, पण प्रत्यक्षात उत्पन्न ५ हजार आले. पण आताच्या अंदाजपत्रकात ही सद्यस्थिती पाहता हे उत्पन्न ६ हजार गृहीत धरण्यात आले आहे. तोटा कमी करण्यासाठी खर्च कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाचा आकडा बराच खाली येणार आहे. ------------------अशी मिळते मदत- परिवहनला मनपाच्या अंदाजपत्रकात ५ कोटी अनुदानाची तरतूद केली गेली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी देण्यात आले आहेत. तसेच सेवानिवृत्तांसाठी ५ कोटींची तरतूद केली असून आतापर्यंत ४ कोटी ८० लाख वितरित झाले आहेत. महिला बालकल्याण विभागाकडून शालेय मुलींसाठी मोफत बस प्रवास अनुदानापोटी १ कोटी ४० लाख अनुदान मिळाले आहे. पोलीस अनुदानापोटी आलेले १ कोटी ८७ लाख अनुदान तत्कालीन आयुक्तांनी परत पाठविले आहे. आता ही रक्कम दोन कोटींवर गेली आहे. हे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांगांसाठी मोफत बसप्रवासापोटी शासनाकडून १७०० जणांसाठी प्रत्येकी ३६०० प्रमाणे अनुदान दिले जाते. आता दिव्यांगांनाही नाक्याच्याबाहेरही ही सवलत देण्यासाठी प्रत्येकी ७२०० रुपये अनुदानाची मागणी केली आहे.
सोलापूर महानगरपालिका परिवहनचे उत्पन्न १० कोटींनी कमी, मनपाच्या अंदाजपत्रकातही करण्यात आली कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:21 PM
मनपा परिवहनच्या (एसएमटी) उत्पन्नात अंदाजपत्रकात धरलेल्या गृहीतकापेक्षा १० कोटींनी उत्पन्न कमी आले आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात बरीच कपात करण्यावर भर देण्यात आला आहे.
ठळक मुद्देमनपाच्या अंदाजपत्रकासारखी परिवहनच्या अंदाजपत्रकाची स्थिती झालीसन २०१७-१८ साठी परिवहनचे ८३ कोटींचे अंदाजपत्रक मांडण्यात आले होतेचेसीक्रॅक समस्यामुळे मोठ्या बस धक्क्याला लागल्या