सोलापूर : मनपाची मार्च महिन्याचीही सभा मंगळवारी दिवंगतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. मनपात सत्तेवर आलेल्या भाजपाने सभा तहकूब करण्याची परंपरा कायम राखली असून, यामुळे विकासाचे अनेक प्रस्ताव निर्णयाविना अडकल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे.
महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मार्च महिन्याची सभा झाली. सभेच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सामाजिक समतेची क्रांती केल्याच्या घटनेला ९१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद चंदनशिवे, किसन जाधव, नागेश वल्याळ, नारायण बनसोडे, चेतन नरोटे, श्रीनिवास रिकमले, राजकुमार हंचाटे यांनी आपले मत मांडले. त्यानंतर माजी मंत्री पतंगराव कदम, काशीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य, सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे रुद्रेश माळगे, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, अभिनेत्री श्रीदेवी, गंगाधर उंबरजे, ज्येष्ठ पत्रकार सीताराम कुलकर्णी यांच्या निधनाबाबत महापौर शोभा बनशेट्टी यांनी शोकप्रस्ताव मांडला. या दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली.
जानेवारी महिन्याची सभा तहकूब झाल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे. यापूर्वीच्या सभा तहकूब झाल्याने अनेक प्रस्ताव मंजुरीविना लटकले आहेत. त्यामुळे प्रशासनाला ९0 दिवस पूर्ण होण्याची वाट पाहावी लागत आहे. प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास अडचण निर्माण होत असल्याने अनेक कामे अडकून पडली आहेत. याचे पदाधिकाºयांना गांभीर्य दिसत नसल्याबाबत अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मार्च महिन्याच्या सभेत स्मार्ट सिटी अंतर्गत अर्बन युनियन डेलिगेशन संस्थेतर्फे आलेल्या पत्रावरून नावीन्यपूर्ण सुविधांसाठी स्पेनमधील मुर्शीया शहराबरोबर करार करणे तर यापूर्वीच्या सभांमध्ये १८0 कोटींच्या ड्रेनेज योजनेला मंजुरी, अमृत योजनेची कामे आदी महत्त्वाचे विषय प्रलंबित राहिले आहेत.
विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी आजची सभा तहकूब करण्याबाबत महापौरांना विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन दिवंगतांना श्रद्धांजली वाहणे महत्त्वाचे असल्याने तसा निर्णय घेतला. तहकूब सभा लवकर काढण्याबाबत महापौरांना विनंती करू. - संजय कोळी, सभागृहनेते