साेलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी महापाैर आमचाच असेल असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. भाजपला काँग्रेस हाच पर्याय असून महापाैर काँग्रेसचाच हाेईल, असा दावा काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षांनी केला आहे. शिवसेनेचीही हीच भूमिका आहे.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. पवार यांनी पुण्यात बैठक घेऊन शहरातील पदाधिकाऱ्यांना कामाला लावण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना नगरसेवक महेश काेठे, एमआयएमचे ताैफिक शेख व इतर पाच नगरसेवक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश लवकरच हाेईल, असेही शहरातील पदाधिकारी सांगत आहेत. काेठे शिवसेनेतच राहतील, असे सेनेचे काही पदाधिकारी सांगत हाेते. मात्र, या सेना पदाधिकाऱ्यांची गाेची झाली आहे.
भाजपने साेलापूरची वाट लावली. दाेन माजी मंत्र्यांची भांडणे, खड्डेमय साेलापूर, प्रशासनावर धाक नाही, स्थायी समितीचा चेअरमन दिला नाही. पाण्याची क्षमता असूनही पाच दिवसांआड पाणी दिले जाते. भाजपने जातीचे बाेगस दाखल्याच्या आधारे खासदार निवडून आणले. या सर्व गाेष्टी लाेक बघत आहेत. साेलापुरात भाजपला काँग्रेस हाच पर्याय आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागले असून आगामी महापाैर काँग्रेसचाच असेल.
- मनाेज यलगुलवार, कार्याध्यक्ष, काँग्रेस.
राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी चांगली झाली आहे. शहराच्या सर्वच प्रभागांत एक हजारहून अधिक पदाधिकारी कार्यरत आहेत. पालिकेच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले महेश काेठे, ताैफिक शेख यांचा गटही राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांनीच या निवडणुकीत लक्ष घातल्याने आगामी महापाैर राष्ट्रवादीचा हाेईल.
- संताेष पवार, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी.
शहरात शिवसेनेची ताकद आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर सेनेचे १४ नगरससेवक निवडून आले आहेत. कुणी आले-गेले आम्हाला फरक पडत नाही. कार्यकर्ता, मतदार हा विचारांवर ठाम आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार असल्याने महापाैर सेनेचा हाेईल.
- पुरुषाेत्तम बरडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
----