सोलापूर : शहरातील १७ सिग्नल व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्तीचे काम पुण्याच्या एका संस्थेला देऊन महापालिकेने सर्व जबाबदारी पोलिसांकडे दिली आहे, अशी माहिती प्रभारी नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली.
शहरातील वाहतुकीचे नियंत्रण होण्यासाठी १७ महत्त्वाच्या चौकात महापालिकेतर्फे सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचा ठेका देण्यात आलेला आहे. ही संस्था थेट पोलिसांना जोडून देण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणेत ज्या ठिकाणी पोलिसांना अडचण येते तेथे ही संस्था तातडीने काम करून देत आहे. सर्व सिग्नल नियंत्रण बोर्डाच्या चाव्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडे आहेत. ज्या ज्या वेळी पोलिसांच्या तक्रारी येतात त्यावेळी महापालिका सुविधा उपलब्ध करून देत असते. आता नव्याने सर्व चौकातील सिग्नलजवळ झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात आले आहेत.
भैय्या चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येते पण सिग्नल चुकीचे दाखवित असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील अनेक रस्त्यांवर वाहने आडवी तिडवी लावली जातात. पार्किंगची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले जात आहे.
पण प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टींकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे असताना महापालिकेकडे बोट केले जात आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे रंगभवन व डफरीन चौकातील सिग्नल बंद आहेत.वापरच होत नसल्याने जुना एम्प्लॉयमेंट चौकातील दिवे काढून इतरत्र लावण्यात आले आहेत. गरुड बंगल्याजवळ नव्याने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. पण केवळ संख्याबळ कमी असल्याचे कारण दाखवून शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील बरेच सिग्नल बंद ठेवले असल्याचे दिसून येत आहे.