महेश कुलकर्णी
रात्री 01:30 ते 02:00सोलापूर : पहाटे दीडची वेळ. शहरात सर्वत्र नीरव शांतता. रस्त्यांवर शुकशुकाट. ‘रात्रीचे सोलापूर’चा आढावा घेण्यासाठी आम्ही निघालो. आसरा, लष्कर, मुर्गीनाला परिसरातून पुढे जात शासकीय रुग्णालय. रुग्णालयात नेमकी मध्यरात्री काय परिस्थिती आहे, हे पाहण्यासाठी आम्ही शासकीय रुग्णालयात प्रवेश केला. ओपीडीमध्ये पोहोचल्यावर पाच मिनिटांपूर्वी एक रुग्ण दाखल झाल्याचे कळले. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथील पंचावन्न वर्षीय सुधाकर मारुती उघडे असे रुग्णाचे नाव. त्यांनी गोचीड मारण्याचे विषारी औषध प्राशन केले होते. नातेवाईकांनी त्यांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना जोराची उसळी मारून ‘ये ऽ सोडा, मला मरू द्या! या मतलबी जगात मला जगायचे नाही’, अशा आवाजात जोरजोरात आक्रोश करणाºया उघडेकाकांनी रात्रीच्या शांततेचा अन् मतलबी दुनियेचाही बुरखाही टराटरा फाडला.
श्वानांचा वर्ग - रात्रीच्या रक्षणाची जबाबदारी श्वानांची असते. बंगलेवाल्यांनी खासगी कुत्री पाळलेली असतात. रात्री रस्त्यावर फिरणारी बेवारस कुत्री त्या त्या परिसराचे रक्षण करीत असतात. वेगळ्या काही हालचाली दिसल्यावर भुंकून रखवालदारांना जागे करण्याची ‘ड्यूटी’ ही कुत्री चोख बजावत असतात. पहाटे १.४० च्या दरम्यान सिव्हिल चौकाच्या अलीकडे सात-आठ कुत्री एकत्र येऊन खेळत होती. हे पाहून जणू श्वानांचा वर्ग भरला आहे की काय, असेच वाटत होते.
ये, पागल समझा है क्या...- शहाण्या माणसांची दिवसभर जगण्याची धडपड रात्रीच्या गडद अंधारात विसावते. मात्र समाजाने ज्यांना वेडे ठरवलेले आहे, असे मनोरुग्ण रात्री फिरत असतात. बºयाच वेळा त्यांचा दिवस रात्रीच्या अंधारात सुरू होतो. रात्रीच्या काळोखात त्यांना ‘वेडे’ ठरविणारे कोणी नसते, बहुधा याचमुळे हे मनोरुग्ण रात्री फिरत असावेत. लष्कर चौकातील असाच एक ‘वेडा’ भेटला. हातात दोन काठ्या घेऊन कोणाला तरी मारण्यासाठी निघालेल्या मनोरुग्णाला आम्ही नाव विचारायचा प्रयत्न केला. परंतु त्याने नाव तर सांगितलेच नाही, मात्र ‘ये, पागल समझा है क्या’ असे म्हणून वेडा नसल्याची पावती दिली. हातातली काठी आमच्यावर उगारत कोणाला तरी मी मारायला चाललो आहे, असेही सांगितले.
पोलिसांची गस्त- शासकीय रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टरांचे संरक्षण करण्यासाठी सहायक फौजदार बिराजदार, हेडकॉन्स्टेबल रणजित बनसोडे, दीपक पवार, जगन्नाथ रूपनर, हरी पवार तैनात होते. तर शासकीय रुग्णालयात डॉ. बालाजी माने, डॉ. प्रवीण माने, डॉ. क्षितिज नायर, डॉ. प्रवीणा निलगे, माया शिंदे, महेश जोगदंड, योगेश मोरे, सुजित कांबळे, संदेश ताम्हणे सेवा बजावत होते. रंगभवन चौकात गस्तीसाठी दोन गाड्या उभ्या होत्या. या दोन गाड्यांमधून पाच पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. सिद्धेश्वर यात्रेची पार्श्वभूमी स्मार्ट सिटीमधून सुशोभित करण्यात आलेल्या रंगभवन चौकातील शोभिवंत वस्तूला कोणी क्षती पोहोचवू नये म्हणून हे पोलीस काळजी घेत आहेत.
२४ तास औषध सेवा- शासकीय रुग्णालयातून रंगभवनमार्गे सात रस्ता येथील गरुड बंगल्याजवळ आम्ही पोहोचलो. येथे २४ तास औषधांची विक्री करणारे औषधांचे दुकान दिसले. रात्री तातडीची औषधांची गरज असणाºयांसाठी ही सेवा सुरू केल्याचे सचिन माळवदकर यांनी सांगितले. नारायण पवार, कांतीकुमार पाटील, व्यंकटेश शिंदे हे तरुण रात्रभर जागून रुग्णांच्या नातेवाईकांना ही सेवा देतात.