सोलापूर : श्रद्धा जरूर असावी. मात्र ती अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धेतूनच भोंदूबाबा पुढे येतात. दरबार भरवतात. डोक्यात काही तरी भूत घालून गैरकृत्य करण्यास भाग पाडतात. राज्यात एखादे हत्याकांड घडले तर इथल्या मांत्रिकांचा विषय निघतो. हत्याकांडातील मांत्रिकांमुळे सोलापूर बदनाम होत आहे. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अंधश्रद्धाळूंचे शोषण होताना आसरा पुलापासून ते विडी घरकूलपर्यंतचे हतबल नागरिक भोंदूबाबांच्या दरबारातील जाळ्यात अडकतात.
सांगली सामूहिक आत्महत्यामागे सोलापुरातील मांत्रिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. याचा सर्वांना धक्का बसला असला तरी यापूर्वीदेखील सोलापुरात मांत्रिकांच्या मदतीने हत्या झालेल्या आहेत. नवीन विडी घरकूल परिसरात दोन वर्षांपूर्वी एका मांत्रिकाने महिलेची हत्या केली. शहरातील आसरा पूल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिद्धेश्वर पेठ, अक्कलकोट रस्ता एमआयडीसी, सुनील नगर, नीलम नगर, जुना विडी घरकूल तसेच नवीन विडी घरकूल परिसरातील काही स्थळे भोंदूबाबांचे अड्डे बनले आहेत.
स्वागत नगरला टोपीवाला फेमस
बहुतांश मांत्रिक बोलबच्चन आहेत, अशी चर्चा असतानाही पती-पत्नींमधील वाद, घरातील ताणतणाव, मानसिक आजार आदी कैक विषय घेऊन नागरिक भोंदूबाबांचे दरबार गाठतातच. तेथे गेल्यावर दोन-तीन वेळा किरकोळ उपचार करायला सांगतात. येणारे जर वारंवार येत असतील तर त्यांना ते हेरतात. मग बक्कळ पैसा उकळण्याचा गोरखधंदा सुरू करतात. कुमठा नाका परिसरातून पुढे गेल्यानंतर स्वागत नगर परिसर लागतो. येथे एक धार्मिक स्थळ आहे. टोपीवालानामक बाबा या ठिकाणी गादी चालवतो. लिंबू अन् चिठ्ठीवर मंत्र उच्चारून दारिद्र्य पळवून लावण्याचे आश्वासन देतो. त्याबदल्यात समोरच्याकडून पैसेदेखील वसूल करतो. हा अनेक वर्षांचा खेळ बिनदिक्कतपणे सुरू आहे. ज्याची पिळवणूक झाली ते गपगुमान राहतात ते बदनामीच्या भीतीने.
मूल होत नाहीये, तर मांत्रिकाला भेटा
पूर्व भागात अशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी श्रमिक मोठ्या संख्येने राहतात. अशा भूलथापांना श्रमिक लवकर बळी पडतात. पूर्व भागातील काही महिलांनी सांगितलेली हकिकत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसराबाहेर असलेल्या एका मांत्रिकाकडे लोकांच्या सांगण्यावरून त्या गेल्या. भेटीमागे मूल होत नसल्याचे कारण होते. पेशी सक्रिय नसल्यामुळे मूल होत नाही. मसाजद्वारे शरीरातील पेशी जिवंत होतात. त्यानंतर मूल होण्याची शक्यता वाढते, असा त्या मांत्रिकाचा दावा आहे. मसाजच्या नावाखाली तो शारीरिक शोषण करतो, अशी तक्रार आहे. काहींनी तक्रार केल्यानंतर तो काही दिवस गायब झाला. अलीकडच्या काळात तो पुन्हा सक्रिय झाल्याचे लोक सांगतात.
नरबळी, अमानुष प्रथा, अघोरी घटना आणि बुवाबाजीचे प्रकार सोलापुरात मोठ्या प्रमाणात चालतात. याबाबत लोकांमध्ये जागृती नाही. स्वागत नगर, नीलम नगर परिसरात पन्नासहून अधिक मांत्रिक भेटतील. गरीब लोकांची लुटमार होते. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना पोलिसांकडून कारवाई होत नाहीत, ही शोकांतिका आहे.
- कुंडलिक मोरे, अंनिस : माजी कार्याध्यक्ष