- विलास जळकोटकर सोलापूर - फायनान्स कंपनीच्या कर्जाची वसुली करुन सोलापूरकडे निघालेल्या दोघांना अडवून त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याजवळील दीड लाख रुपयांची रोकड, मोबाईल, टॅब सह १ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ही सनसनाटी घटना सोलापूर - विजयपूर हायवेरील डेंटल कॉलेजच्या पुलावरील रोडवर घडली.
या प्रकरणी सनी गणेश शिक्का (वय- १९, रा. अवंतीनगर, सोलापूृर ) यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यातील फिर्यादी सनी व प्रशांत सुरेंद्र कांबळे हे दोघे भारत फायनान्स कंपनीच्या कर्जाच्या वसुलीचे काम करतात. बुधवारी ( २३) त्यांनी चिंचोळी एमआयडीसी परिसरात वसुली दीड लाखाच्या रोकडची वसुली केली. त्यानंतर ते दुचाकीवरुन देशमुख पाटील वस्तीकडे जात होते. डेंटल कॉलेज जवळील पुलावरून जाताना दुचाकोवरूनआलेले दोघे त्यांना पाहत पुढे गेले. १०० मीटर अंतरावर थांबलेल्या एका तरुणाजवळ थाबले. याचदरम्यान फिर्यादी सनी त्यांच्याजवळून जाताना, तिघांनी त्यांना अडविले. काही कळण्यापूर्वीच एकाने प्रशांत कांबळेच्या कानशिलात लगावून, पैशाची बॅग आणि मोबाईलची मागणी केली. तेवढ्यात दुसर्या तरुणाने बेसबॉल बॅटने बेदम मारहाण केली. प्रशांत बॅग सोडत नसल्याने त्याच्या डोक्यावर बेसबॅटनं हल्ला चढवला. तिसऱ्यानं फिर्यादीला दगडाने मारून जखमी केले.
या मारहाणीतमध्ये प्रशांतच्या डोके फुटल्याने रक्तबंबाळ झाले. दोघे जखमीवस्थेत पडल्याने तिघा तरुणांनी रोकड असलेली बॅग, मोबाईल आणि बॅट काढून घेऊन विजापूर रोडच्या दिशेने पोबारा केला. या दरम्यान तेथून जाणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे करीत आहेत.
चोरटे निर्ढावले..दिवसाही चोऱ्याएरवी रात्री होणारे चोऱ्यांचे सत्र आता दिवसाही घडू लागले आहे. संबंधीत प्रकार हा नजर ठेऊन केला असावा. त्या तरुणांकडे असलेल्या रोख रक्कमेचा सुगावा चोरट्यांना यापूर्वीच असून, त्यांचा माग काढत हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.