- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथे सोमवारी १३०० कांदा गाड्यांची आवक झाली आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वाधिक आवक झाल्याचे बाजार समितीने प्रशासनाने सांगितले. आलेल्या गाड्यांची आवक, लिलावास होणारा उशिर व मार्केट यार्डातील गाड्यांची वाहतूक कोंडी यामुळे बाजार समिती प्रशासनाने मंगळवार १२ डिसेंबर २०२३ रोजी कांदा लिलाव न करण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्यातबंदीमुळे राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा, आंदोलनामुळे अन्य जिल्ह्यातून कांदा सोलापूर मार्केट यार्डात आल्याने कांद्याचे दर गडगडला असल्याचे बोलले जात आहे. सोलापुरात सोमवारी कमीत कमी १५००, जास्तीत जास्त ३ हजार तर सर्वसाधारण दर २२०० रूपये असा दर मिळाल्याचे शेतकऱ्यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. आज यार्डात बहुतांश कांदा हा अजून कच्चा असलेला माल आल्याने त्याचा दरावरही परिणाम झाल्याचे दिसून येते असेही अनेकांनी सांगितले. बाजार समिती प्रशासनाने सांगितले की, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सर्व आडते, व्यापारी, माथाडी कामगार व शेतकरी यांना कळविण्यात येते की १२ डिसेंबर २०२३ रोजी कांदा मार्केट बंद राहील याची सर्वांनी नोंद घावी व तसेच उद्या कांदा गाडी रात्री १० च्या पुढे सोडण्यात येईल असे बाजार समिती प्रशासनाने कळविले आहे.