- रवींद्र देशमुख सोलापूर : नाशिक, अहमदनगरमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने नाफेड खरेदी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने शासन खरेदी करणार आहे तर दुसरीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला सध्या सरासरी १५०० ते २७०० रुपयांचा दर मिळत आहे.
कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारणी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकरी व व्यापारी आक्रमक झाले आहेत. निर्यात शुल्कवाढीला विरोध करण्यासाठी लिलाव बंद ठेवण्यात आल्याने केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतलेला आहे. सध्या निर्यातीसाठी कंटेनर मध्ये भरलेला कांदा नाफेडच्या दरानुसार केंद्र सरकार खरेदी करणार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी नाशिक, अहमदनगर या ठिकाणी नाफेड खरेदी केंद्र सुरू करून त्या मार्फत शासन प्रतिक्विंटल २४०० रुपये दराने कांदा खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
राज्यातील प्रमुख कांदा मार्केट म्हणून नावारूपास आलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. एकीकडे राज्यात लिलाव बंद असताना गेल्या दोन दिवसापासून सोलापूर बाजार समितीत सुरळीतपणे सुरू आहे. सोमवारी ११० ट्रक कांद्याचे आवक होती मंगळवारी त्यात वाढ होऊन १५० ट्रक आवक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शिवाय प्रतिक्विंटल १५०० ते २७०० सरासरी दर मिळत आहे चांगल्या मालाला ३५०० रुपयाचाही दर मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोलापूर बाजार समितीतील कांदा मार्केट सुरळीतपणे सुरू असल्याचे व्यापारी संचालक केदार उंबरजे यांनी सांगितले.
बैठकीत लिलाव सुरळीत ठेवण्याचा निर्णय मंगळवारी कांदा व्यापारी, अडत व्यापारी, हमाल तोलार यांची बैठक झाली. सोलापूर मार्केट मध्ये येणारा कांदा थेट एक्सपोर्ट होत नाही. त्यामुळे निर्यात शुल्कवाढीचा फटका आपल्याकडील शेतकऱ्यांना बसणार नाही. त्यामुळे लिलाव सुरळीत ठेवून शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.