सोलापूर : तमिळनाडूमध्ये अम्मा कॅन्टीन लोकप्रिय आहे. भरपेट आणि स्वादिष्ट भोजन कॅन्टीनमधून मिळते, तेही अत्यल्प दरात. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शिवभोजन थाळी ही योजना अमलात आणली. लॉकडाऊनमुळे शिवभोजन थाळी अगदी मोफत करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात रोज २,८०० नागरिकांच्या हातात शिवभोजनाची थाळी मिळते. प्रत्यक्षात याहून दहा पटीने अधिक शिवभोजन थाळीला मागणी आहे.
लॉकडॉऊनमुळे अनेकांची रोजीरोटी बुडाली. रोजगार बुडाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांची ‘रोटी’ ची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे त्यांच्या भाषणात सांगितले. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाख इतकी आहे. श्रमिक कामगारांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या जिल्ह्यात फक्त रोज तीन २,८०० लोकांनाच मोफत जेवण मिळते, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, असे श्रमिक कामगार संघटनांचे प्रतिनिधी म्हणताहेत. .............
जिल्ह्यात शिवभोजन केंद्र
३३
दररोज लाभ - २,८०० थाळी
स्वादिष्ट मेनू
सोलापूर शहर परिसरात एकूण पाच ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू आहे. या पाच केंद्रांवर फक्त ८२५ थाळी वितरित होतात. त्यासोबत ग्रामीण भागात २८ ठिकाणी शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. या २८ ठिकाणी दररोज १,८०० ते २ हजार थाळी वितरित होतात. भाजी, दोन पोळी. वाटीभर भात, आमटी असा मेनू मिळतो. पूर्वी प्रति थाळी पाच रुपये आकारले जायचे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार थाळी मोफत दिली जात आहे.
या लॉकडाऊन काळात कारखाने बंद आहेत. त्यामुळे खाण्याचे वांदे होत आहेत. अशा काळात शिवभोजन थाळी केंद्राचा आधार वाटतो. एखाद्या दिवशी उशीर झाल्यास केंद्र बंद होऊन जाते. त्या दिवशी उपाशी राहावे लागते.
तुळशीदास माने
अवघ्या तासाभरात शिवभोजन केंद्र बंद पडते. त्यानंतर आलेल्या नागरिकांची पंचाईत होते. भोजन मिळत नाही. थाळींची संख्या वाढवा.
- असलम पठाण
सोलापूर जिल्हा खूप मोठा आहे. प्रत्येक गावात शिवभोजन केंद्र असावे. केंद्रांची संख्या वाढली पाहिजे. अन्यथा उपाशी राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल.
- जावेद अली