सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूरच्या पार्क मैदानावर सभास्थळी आगमन होताच सभा क्षणभराचाही वेळ न दवडता सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार, बुके अथवा फुले न देता मोदींच्या हाती थेट शतकापूर्वीची हस्तलिखित भगवत् गीता दिली... खांद्यावर धनगर समाजाचे उपरणे असलेले घोंगडे घातले, डोक्यावर पगडी ठेवली अन् दुस-या हातात म्यान केलेली तलवार दिली... मोदींचं स्वागत झालं.... पंतप्रधानांनी तलवार उंच करून श्रोत्यांना अभिवादन केलं, तेव्हा संपूर्ण स्टेडियम ‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी दुमदुमून गेलं.
दरम्यान, सोलापुरात रिमोटची कळ दाबून मोदींनी केले सोलापूर-उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापुरात उभारत असलेल्या ३० हजार घरांच्या वसाहतीची पायाभरणी आणि अन्य विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी मोदी सोलापुरात आले. राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख मंचावर होते.
मोदींच्या आगमनापूर्वी पार्क परिसरातील विविध चौकांमध्ये आंदोलनेही झाली. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करू पाहणा-या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची धरपकड करण्यात आली. एकीकडे हा माहोल असताना पार्क परिसरात मात्र उत्साहाला उधाण आले होते. सकाळी ११.०६ वाजता मोदींचे सभास्थळी आगमन होताच संपूर्ण सोलापूर मोदीमय झाले. पार्क मैदानावर चौफेर गर्दी होती. रे नगर वसाहतीचे प्रवर्तक नरसय्या आडम जेव्हा बोलायला उभारले तेव्हा त्यांनी मोदी यांच्यावर स्तूतीसुमने वाहीली...पंतप्रधान मोदीने हम को ऐसा मकान दिया..हम मरेतक नही भुलेंगे...आमची ही भावना आहे, असे सांगताच श्रोत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.