- रवींद्र देशमुख सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर अकलूज कुर्डूवाडी या तीन बाजार समितीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. पंढरपुरात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक व अकलूजमध्ये भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांना बाजार समिती ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. तर कुर्डूवाडी बाजार समितीवर राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे गटाची सत्ता कायम राहिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पाच बाजार समिती शुक्रवारी शांततेत व चुरशीने मतदान झाले. मतदान झाल्यानंतर मंगळवेढा बाजार समितीसाठी शुक्रवारीच मतमोजणी झाली. मंगळवेढ्यातील तेरा जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित पाच जागाही आवताडे गटाला मिळाल्या त्यामुळे भाजपचे आमदार समाधान आवताडे व त्यांचे बंधू डीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्याकडे सत्ता राहिली आहे.
अक्कलकोट बाजार समितीची मतमोजणी रविवारी होणार आहे. तसेच सांगोला व दुधनी बाजार समितीसाठी रविवारी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.