- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : पंढरपूरच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसात पंढरपूरला आणखी एक विशेष गाडी मिळणार असून सांगली, सातारामार्गे ही नवी गाडी मुंबईला पोहोचणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप रेल्वेने प्रसिध्द केली नाही.
पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. शिवाय आषाढी यात्रेत तर लाखो भाविकांची गर्दी असते. दररोज शेकडो भाविक पंढरपूरला एसटी व खासगी बसने येतात. शिवाय रेल्वेने येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. सध्या पंढरपूर शहरात रेल्वे स्थानक आहे. याठिकाणाहून अनेक रेल्वे गाड्या धावतात. सध्या मुंबई-पंढरपूर ही एक गाडी कुर्डूवाडी मार्गे दररोज धावते. त्याला प्रतिसादही मोठया प्रमाणात आहे. मात्र आता दुसरी मुंबई-पंढरपूर गाडी आता सातारा सांगली मार्गे सुरु होणार असल्याचे संकेत प्रवासी संघटनेने दिले आहे.