- आप्पासाहेब पाटीलपंढरपूर - दाखल गुन्ह्यात मोटारसायकल न दाखविण्यासाठी तसेच तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना पंढरपुरातील पोलिस नाईकास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही सापळा कारवाई शुक्रवार १० मे २०२४ रोजी यशस्वी झाली. याप्रकरणी पेालिस नाईक याच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
वैजिनाथ संदीपान कुंभार (वय ५२, रा. अर्थव बिल्डिंग, ब्लॉक नंबर २०७, पुजारी सिटी, इसबावी, पंढरपूर) असे लाच स्वीकारलेल्या पोलिस नाईकाचे नाव आहे. याबाबत सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटारसायकल न दाखविण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी पोलिस नाईक कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५० हजार रूपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लाच रक्कम स्वत:त स्वीकारल्यावरून पोलिस नाईकास रंगेहात पकडण्यात आल्याचे एसीबी, सोलापूरने प्रेसनोटव्दारे सांगितले आहे. हा सापळा पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पेालिस अंमलदार पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे, सलीम मुल्ला, पोलिस नाईक स्वामीराव जाधव, चालक शाम सुरवसे यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली.