संताजी शिंदे
सोलापूर : स्वतंत्रता दिन..दीपावली, दशहरा, ईद, मोहरम, बैसाखी, ख्रिसमस, पर्युषण जैसे मनाओ, राष्ट्रीय त्योहार जैसे मनाओ। असा संदेश देत चाळीस वर्षांपासून दिव्यकांत गांधी हे राष्ट्रभक्त तिरंग्याच्या माध्यमातून समाजाला एकजुटीचा संदेश देत आहेत. सोलापूर जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यात जाऊन स्वातंत्र्य दिनाबरोबर तिरंगा झेंड्याचे महत्त्व सांगतात. स्केटिंग खेळणाºया शाळकरी मुलांसमवेत गावागावात जाऊन स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त जनजागृती केली जाते.
दिव्यकांत चुनीलाल गांधी हे सध्या ७१ वर्षांचे असून, त्यांनी नागपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. दिव्यकांत गांधी यांचे ज्येष्ठ बंधू दिलीप गांधी हे अमेरिकेत स्थायिक आहेत. दिलीप गांधी व नातेवाईक जेव्हा भारतात येत असत तेव्हा ते अमेरिकेतील लोकांची देशभक्ती व भारतीयांची देशभक्ती यावर चर्चा करीत होते. दिव्यकांत गांधी यांना भारतीय लोक देशभक्तीवर जास्त बोलत नसल्याची खंत त्यांना वाटत होती. समाजामध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी दिव्यकांत गांधी यांनी तिरंगा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. आपला व्यवसाय सांभाळत त्यांनी १५ आॅगस्ट हा स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. शहरातील शाळांना आवाहन करून विद्यार्थ्यांना गोळा करू लागले. विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा ध्वज देऊन विविध भागातून प्रभातफेरी काढली जाते.
२६ जानेवारी २००० रोजी गुजरात राज्यातील कच्छ, सौराष्टÑ या ठिकाणी मोठा भूकंप झाला होता. वित्त व जीवितहानी झाली होती; मात्र हा दिवस काळा दिन म्हणून साजरा होऊ नये यासाठी दिव्यकांत गांधी हे घटनेनंतर चौथ्या दिवशी गुजरातमध्ये गेले. भूकंपग्रस्त लोकांना बॅग व कपड्याची मदत करीत प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले होते. सुमारे १०० गावातून त्यांनी दौरा केला होता. सद्भावना सेवा दलाच्या माध्यमातून दिव्यकांत गांधी हे शासकीय रुग्णालयात गेल्या २८ वर्षांपासून धर्मशाळा व पाणपोई चालवतात. अवघ्या ५ रुपयात रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय करून दिली आहे. लोकांसाठी मदतकेंद्रही चालवत आहेत.
खेल और संस्कार साथ साथ...बालपणापासूनच विद्यार्थ्यांना देशभक्तीची आवड निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून ते शालेय विद्यार्थ्यांसाठी, शुल्क न घेता ‘चेतक स्केटिंग’ चालवतात. विद्यार्थ्यांना स्केटिंग खेळाचे ज्ञान देत असताना ते मुलांना घरात आई-वडिलांसोबत कसे वागावे, समाजात कसे रहावे. शिस्त कशी पाळावी आणि आपली देशभक्ती जोपासावी याचे शिक्षण देतात. स्केटिंग खेळणाºया विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा झेंडा देऊन शहर तालुक्यातील बाजारपेठा, गावातील वेशी, वाड्यावस्त्यांवर विद्यार्थ्यांसमवेत १५ आॅगस्ट, २६ जानेवारी दिनानिमित्त जनजागृती केली जाते. विद्यार्थी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होतात.