सोलापूर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर धनगर समाज कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी भंडारा टाकला. या प्रकरणानंतर सतर्क झालेल्या शहर पोलिसांनी बुधवारी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दाैऱ्यात पत्रकार आणि कार्यकर्त्यांची तपासणी केली. सर्वांनाच खिसे-रुमाल झटकून प्रवेश देण्यात आला.
शासकीय कार्यक्रमासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू बुधवारी साेलापुरात हाेते. येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी सकाळी 11.30 वाजता त्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला आलेले प्रहारचे कार्यकर्ते, पत्रकार यांची पाेलिसांनी कसून तपासणी केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा टाकणाऱ्या धनगर समाज कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रुमालात लपवून भंडारा आणला हाेता. पाेलिसांच्या समाेरच त्यांनी भंडारा टाकला हाेता.
या प्रकरणानंतर पाेलिसांवर टीका झाली. त्यामुळे पाेलिसांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात बच्चू कडू यांना भेटायला आलेले कार्यकर्ते, पत्रकार यांचे खिसे, बॅगा, पाकिटे तपासली. पाकिटात काही लपवून आणले आहे याबद्दल विचारणा केली. ही तपासणी झाल्यानंतरही पाेलिस बच्चू कडू यांच्या आजूबाजूला काेण थांबलय, काय करतय याची पाहणी करीत असल्याचे दिसून आले.