सोलापूर : होटगी रोडवरील जुन्या हॉटेल रंगोलीमध्ये सुरू असलेल्या जुगार खेळावर धाड टाकून माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.
हॉटेल रंगोली येथे जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके व त्यांचे पथक घटनास्थळी गेले असता बाहेर कर्नाटक राज्यातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील (वय ६५ रा.वीरभद्र बांगला, ए.जी.पाटील कॉलेजच्या पाठीमागे सोरेगाव) हे व त्यांचे कार्यकर्ते हॉटेलच्या बाहेर खुर्च्या टाकून बसले होते. पोलिसांनी जाऊन चौकशी केली असता माजी आमदार रवी पाटील यांनी प्रथमतः हॉटेलचं नूतनीकरण सुरू आहे, त्याचं काम पाहात बसलो असल्याचं सांगितलं. अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यांच्यासोबत बसलेल्या एका व्यक्तीजवळ हातामध्ये नोटांचे बंडल दिसले. नोटांचे बंडल समोर टेबलावर ठेव,असे पोलिसांनी म्हटले असता कार्यकर्त्याने नकार दिला. दरम्यान रवी पाटील व पोलिसांमध्ये थोडी शाब्दिक चकमक उडाली. पथकातील अन्य पोलिसांनी हॉटेलमध्ये थेट प्रवेश केला तेव्हा आतमध्ये पैसे लावून अंदर बाहर हा जुगार सुरू होता. पोलिसांनी आतमध्ये जुगार खेळणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ असलेली रोख रक्कम व अन्य साहित्य जप्त केले. रवी पाटील यांना अन्य लोकांना पोलिसाच्या व्हॅनमध्ये बसवून विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलीस आयुक्त हरीश बैजल पोलीस उपायुक्त बापू बांगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके व त्यांच्या पथकाने पार पडली.
५२ पत्त्यांच्या जुगारात पैशाऐवजी क्वाईनचा वापर
0 हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगारा दरम्यान पैशाऐवजी क्वॉईनचा वापर केला जात होता. पैसे काऊंटरवर भरून त्याऐवजी क्वॉईन घेतले जात होते. जुगार खेळताना हे क्वॉईन लावले जात होते. दहा रुपयापासून ५०० रुपया पर्यंत चे क्वॉईन दुकानांमध्ये खेळण्यासाठी वापरले जात होते. पोलिसांनी पाच हजार रुपये किमतीचे क्वाईन जप्त केले आहेत.
गोव्याच्या धर्तीवर कॅसिनोची तयारी
0 गोव्यामध्ये प्रसिद्ध असलेला कॅसिनो जुगार चालतो, मात्र त्याच धर्तीवर सोलापुरात सुरू करण्यात येत आहे. कायदेशीर अधिकृत कॅसिनो जुगाराची परवानगी व अन्य परवाने घेण्याचे काम सुरू आहे. परवान्यासाठी संबंधित विभागांना अर्ज करण्यात आले आहेत. मात्र परवाने मिळण्या अगोदरच कॅसिनो ऐवजी ५२ पत्त्याचा जुगार सुरु केला होता असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आवाज वाढवायचा नाही पोलिसांनी दिला रवी पाटलांना दम
0 कारवाई दरम्यान रवी पाटील यांनी आपला आवाज वाढवला होता. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांनी रवी पाटील यांना आवाज वाढवायचा नाही अशी तंबी दिली. दरम्यान पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनीही त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला.
0 जुगार खेळणाऱ्यांमध्ये बहुतांश जुगारी कर्नाटक राज्यातील होते. आलिशान गाड्या मध्ये येऊन ते जुगार खेळत होते. पोलिसांना पाहताच त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. जुगार खेळणाऱ्याची संख्या जास्त असल्याने गुन्हे शाखेचे व विजापूर नाका पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचाऱ्यांना घटनास्थळी मदतीसाठी बोलावण्यात आले होते.
कर्नाटकातील कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यासमोर गर्दी
0 माजी आमदार रवी पाटील यांना अटक केल्याचे समजताच कर्नाटकातील कार्यकर्ते सोलापुरात दाखल झाले. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या बाहेरील बाजूस त्यांनी गर्दी केली होती.