सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात झालेल्या बैठकीत विधान परिषदेच्या जागेसाठी माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील व उमेश पाटील यांच्या नावाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चाचपणी केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे. तर इकडे भाजपतर्फे प्रशांत परिचारक यांनाच पुन्हा संधी मिळणार असे सांगितले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना विचारले असता महापालिका व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची वेगळी बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या विषयावर दीड तास मंथन झाले. त्याचबरोबर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची बांधणी यावर चर्चा झाल्याचे जिल्हाध्यक्ष साठे यांनी सांगितले.
आगामी विधान परिषदेबाबत चाचपणी झाल्याचे मला कळले. बैठकीतून परतत असताना काही जणांनी याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मते जाणून घेतल्याचे सांगितले. यात वरील तीन नावांची चर्चा ऐकावयास मिळाल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांची मुदत नोव्हेंबरअखेर संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये विधान परिषदेसाठी निवडणुका होण्याची शक्यता आहे. मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांना निवडून आणण्यात आमदार प्रशांत परिचारक यांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विधानपरिषदेला पुन्हा एकदा परिचारक यांचेच नाव पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे. इतर कोणाच्या नावाची चर्चा नसल्याने परिचारक विरूद्ध माने यांच्यात लढत होणार असे मानले जात आहे.
झेडपीत वाढले लोकप्रतिनिधींचे हेलपाटेविधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झेडपीतील राजकारण तापले आहे. माने यांच्या संपर्क कार्यालयाकडून झेडपीतून ६८ सदस्यांची यादी नेण्यात आली आहे. त्यामुळे माजी आमदार दिलीप माने विधानपरिषदेसाठी तयारी करीत असल्याची चर्चा झेडपीत रंगली आहे. काँग्रेस व शिवसेनेच्या गोटात मात्र अद्याप शांतता दिसत आहे.