सोलापूर : भक्तांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना आग्रह केला, महाराज राजकारण स्वच्छ होण्यासाठी देशाची गरज म्हणून तुम्ही लोकसभेला उभे राहा. त्यावर डॉ. जयसिद्धेश्वर महाराज म्हणाले, भक्तांचा आग्रह मला मान्य आहे, पण गुरूबंधू व मालक यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला मला वेळ द्या.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात भक्तांचा कानोसा घेण्यासाठी रविवारी सायंकाळी शेळगी येथील शिवदासमय मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भक्तांबरोबरच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख पुरूषोत्तम बरडे, महापालिकेचे सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक विनायक वीटकर, शिवानंद पाटील, अमर पुदाले आदी उपस्थित होते.
सुरूवातीला पालकमंत्री देशमुख यांनी बैठक आयोजनामागचा हेतू विशद केला. लोकसभा निवडणूक आता केव्हाही जाहीर होऊ शकते. गेले आठवडाभर सोलापूर लोकसभेसाठी कोण याची चर्चा सुरू आहे. मंगळवारी महास्वामींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून दिली. त्यांच्यात काय चर्चा झाली हे माहीत नाही. पण त्यानंतर महास्वामींनी गुरूबंधू व सहकाºयांची चर्चा करून निर्णय देतो असे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर भक्तांचा कानोसा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना बसवराज ईश्वरकट्टी यांनी देशावर येणारी संकटे पाहता महास्वामींनी सुदर्शन चक्र उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जंगम समाजाचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर, शरणबसप्पा केंगनाळकर, अक्कलकोटचे एम. बी. पाटील यांनी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होऊ शकतात तर महास्वामींनी का निवडणूक लढवू नये असे मत मांडले. सभागृहनेते कोळी, नगरसेवक वीटकर, माजी नगरसेवक अनंत जाधव, बिज्जू प्रधाने यांनी मते मांडली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बरडे यांनी भक्तांचा आग्रह असल्याने महाराजांनी नाराज करू नये असे सांगितले.
महाराजांनी राजकारणात पडू नये- गलिच्छ राजकारणात महाराजांनी पडू नये असे मत गौरव जक्कापुरे यांनी मांडले. डॉ. शिवाचार्य महाराज यांचे ष. ब्र. हे पद खूप मोठे आहे, त्याची खासदारकीशी तुलना होऊ शकत नाही. यावर अक्कलकोटचे धानय्या स्वामी म्हणाले, धर्मशास्त्रात सन्याशाला योग्यवेळी कोणता रोल करावा याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. महास्वामींसारखे तपस्वी राजकारणात उतरले तर सामान्य लोकांचे कल्याण आहे.
खासदार चांगले पण संपर्क कमी- सोलापूरचे सध्याचे खासदार चांगले आहेत पण त्यांचा जनसंपर्क कमी आहे. त्यामुळे खासदार बदलण्याची चर्चा मार्च २0१८ पासून सुरू झाल्याचे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी सांगितले. महास्वामींनी लोकसभा लढविली तर राजकारण स्वच्छ होईल. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून विरोधकांचे टेन्शन वाढले आहे. त्यावर डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या मताला सहमती देत, मला यावर निर्णय घेण्यास काही दिवस आणि वेळ द्या. माझ्या गुरूबंधूशी यावर चर्चा करेन. कोणाच्याही बाबतीत नकारात्मक चर्चा करू नका असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
‘लोकमत’च्या झेरॉक्स प्रती- या बैठकीत लोकमतच्या हॅलो सोलापूरमध्ये ८ फेब्रुवारी रोजी भाजपच्या उमेदवारासंदर्भात आलेल्या वृत्ताच्या छायांकित प्रती वाटण्यात आल्या. त्यामध्ये डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे नाव चर्चेत असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीत हा विषय चर्चेचा ठरला. अनेकांनी हे कात्रण वाचून जवळ ठेवले.