हरिदास रणदिवे अरण: तीन तालुक्यात पसरलेल्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांमधील इच्छुक आमदारकीसाठी कामाला लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनाच उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. आपणच यावेळी निवडणूक रिंगणात आहोत, असे बबनदादा शिंदे वारंवार सांगत असले तरी ऐनवेळी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे निवडणूक रिंगणात उतरल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती आहे. भोसे येथील राजू बापू पाटील सुद्धा विधानसभेसाठी वरूनच फिल्डिंग लावायला सरसावलेले दिसत आहेत. काँग्रेसकडून अकोले खुर्दचे भारत पाटील हे अकलूजकर यांच्या रसदीवर आणि मतदारसंघातील जनसंपर्क यावर तिकिटाची मागणी करण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून प्राध्यापक शिवाजीराव सावंत धनुष्याला दोरी लावून विधानसभेचे लक्ष्य भेदण्याच्या तयारीत आहेत. भाजपाकडून संजय कोकाटे यंदाच्या विधानसभेसाठी लंगोट लावतील. दादासाहेब साठे हे देखील इच्छुक असून, त्यांनाच तिकीट मिळेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटते.
दोन वर्षांपूर्वी आमदार बबनदादा यांच्यापासून झेडपी तिकीट वाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेले समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे ‘मातोश्री’ पासून ‘शिवरत्न’ पर्यंत सर्वपक्षीय मातब्बर नेतेमंडळींशी संपर्क ठेवून आहेत. एकास एक उमेदवार म्हणून सर्वांनी माढा विधानसभा मतदारसंघात आपले नाव पुढे करावे म्हणून रात्रंदिवस पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.
इतर पक्षातीलही नव्या दमाचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीद्वारे तालुका पातळीवरील आपले राजकीय पदार्पण करण्याच्या विचारात असल्याचे दिसत आहे.