शहाजी फुरडे-पाटील ।
बार्शी : बार्शी तालुक्यात निवडणुकांचा कालावधी असो की नसो राजकारणातील प्रमुख गट असलेले आ. दिलीप सोपल व माजी आ. राजेंद्र राऊत हे कायम कुस्तीसाठी लंगोट लावून तयारच असतात़ आजवर दोन गट असलेल्या या तालुक्यात आता राजेंद्र मिरगणे यांचाही सवता सुभा आहे़ विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपेक्षा शिवसेना -भाजपा युती होणार की नाही, यावर आगामी विधानसभेची निवडणूक ही दुरंगी कीतिरंगी होणार हे अवलंबून असणार आहे़ सोपल व राऊत यांच्यातील ही निवडणूक राज्यात लक्षवेधी असणार यात शंकाच नाही.
बार्शी तालुक्याचे राजकारण गेल्या वीस वर्षांपासून आ. दिलीप सोपल विरुध्द माजी आ. राजेंद्र राऊत या पारंपरिक विरोधकांभोवती फिरत आहे. हे दोन्ही नेते ज्या पक्षात असतात तो पक्ष याठिकाणी प्रबळ असतो़ येथील राजकारण हे दोन्ही नेत्यांच्या भोवतीच फिरत आहे़ काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी झाली काय अन् नाही झाली काय ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटणार व उमेदवारी ही आ़ सोपल यांना निश्चित आहे़ तर इकडे सेना-भाजपामध्ये बार्शीची जागा ही शिवसेनेकडे आहे.
महायुती झाली तर ही जागा भाजपाला सुटणार असे दिसत आहे़ त्यामुळे पक्ष कोणताही असला तरी आ़ दिलीप सोपल विरुध्द राजेंद्र राऊत अशी लढत ठरलेली आहे़ सध्या भाजपामध्ये असलेल्या राजेंद्र मिरगणे यांनी मागील वेळेस भाजपाकडून विधानसभेला नशीब आजमावले होते. त्यानंतरही ते पाच वर्षे सक्रिय राहिलेले आहेत.
युती झाल्यास दोन राजेंद्र पैकी उमेदवारी कोणाला मिळणार व उमेदवारी न मिळालेला दुसरा राजेंद्र काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचे आहे़ शिवाय शिवसेनेला जागा राहिल्यास भाऊसाहेब आंधळकर हे धनुष्यबाण हातात घेणार हे निश्चित आहे़