राकेश कदम सोलापूर : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपातील दोन गटांत सुंदोपसुंदी कायम आहे. दोन दिवसांपूर्वी शहर उत्तरमधील शक्ती प्रमुखांच्या संमेलनात सहकारमंत्री गटाला टाळण्यात आले होते. तर रविवारी सोशल मीडियावरील ‘नमो अगेन’ या कार्यशाळेत पालकमंत्री गटाला डावलण्यात आल्याचे दिसून आले.
भाजपच्या सोलापूरलोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी रविवारी सोशल मीडियासंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत भाजपाच्या महाराष्ट्र राज्य आयटी सेलचे प्रमुख आशिष मेरखेड यांनी मार्गदर्शन केले. खासदार अमर साबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी, हेमंत पिंगळे, रामचंद्र जन्नू यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर पालकमंत्री गटाचा एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. यासंदर्भात पालकमंत्री गटातील नगरसेवकांना विचारल्यानंतर त्यांनी कोण कुठे कार्यक्रम घेतोय. आमच्या पक्षाचं काय चाललंय कळत नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या. या कार्यशाळेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी नेमकं काय काय करता येईल, याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी शिवदारे मंगल कार्यालयात शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या गटाचे नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. पण या कार्यक्रमात भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांना बोलावण्यात आलेले नव्हते. आमच्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊनही आम्हाला निमंत्रण दिले जात नाही, याबद्दल तक्रार करणार असल्याचे महापौर बनशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शक्ती प्रमुखांच्या संमेलनाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख अनुपस्थित होते. कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते तर जायचे कसे, असा सवाल पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला होता. पण ही निमंत्रणे निवडणूक वॉर रूममधून दिली जात असल्याचे सांगून सहकारमंत्री गटाने पालकमंत्र्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कुठे आणि कोणती कार्यशाळा झाली, याबद्दल मला माहिती नाही. आम्ही तर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. - संजय कोळी, पक्षनेता.
कोणत्या कार्यक्रमांना कोणाला बोलवायचे हे ठरलेले आहे. प्रदेशाच्या निर्णयाप्रमाणे लोकांना निमंत्रणे दिली जात आहेत. सोशल मीडियासंदर्भातील कार्यशाळा ही कार्यकर्त्यांसाठी होती. त्यामुळे यात निमंत्रणाचा मुद्दा गौण ठरतो. - प्रा. अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष, भाजपा.