solapur politics : ‘मध्य’मध्ये प्रणितींचे नाव फिक्स; भाजपा-सेनेत अनेक जण चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 03:20 PM2018-12-05T15:20:56+5:302018-12-05T15:21:57+5:30
राजकुमार सारोळे । सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा गड तिसºयांदा कायम राखण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे झपाटून कामाला ...
राजकुमार सारोळे ।
सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा गड तिसºयांदा कायम राखण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे झपाटून कामाला लागल्या आहेत तर भाजपा-सेना युती होणार का, यावर महेश कोठे यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. भाजपाकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे तर केंद्रात काँग्रेसबरोबर आघाडी झाली तरी आपली निवडणुकीची तयारी असल्याचे माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी केंद्रीय कमिटीकडे अगोदरच जाहीर केले आहे.
काँग्रेसकडून शहर मध्यमध्ये विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांची तिसºयांदा उमेदवारी फिक्स असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांचे संपर्क दौरे वाढले आहेत. विडी कामगार, अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर त्यांनी जोर दिला आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहाचा त्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी हा मतदारसंघ पिंजून काढला होता. यावेळेस वातावरण बदलले आहे. भाजपा सरकारच्या कारभारावर नाराज झालेल्या लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांना आव्हान देण्यासाठी माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी मोठी तयारी केली आहे. अल्पसंख्याक व विडी कामगारांसाठी ३0 हजार घरांचा नवीन घरकुल प्रकल्प त्यांनी मंजूर करून आणला आहे. या घरकुलाचा फायदा शहर मध्यमधील कुटुंबांना मिळणार आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपातर्फे मोहिनी पत्की यांनी निवडणूक लढविली होती. यावेळेस पत्की यांच्याबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, पांडुरंग दिड्डी, नगरसेवक नागेश वल्याळ, रामचंद्र जन्नू यांची नावे चर्चेत आहेत.
मनपाच्या निवडणुकीत शहर मध्यमध्ये भाजपाचे नगरसेवक वाढले आहेत. शिवसेनेतर्फे महेश कोठे यांच्या नावाची चर्चा आहे. पण कोठे यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. भाजपा-सेना युती झाली तर शहर मध्य अन्यथा शहर उत्तर असा त्यांचा पर्याय खुला आहे. काँग्रेसशी आघाडी न झाल्यास राष्ट्रवादीतर्फे विद्या लोलगे इच्छुक आहेत.
‘एमआयएम’ वर्चस्व राखणार का ?
- एमआयएमचे तौफिक शेख यांनी गेल्यावेळेस चांगलीच मजल मारली होती. महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमची ताकद वाढली आहे. त्यामुळे शहर मध्यमध्ये तौफिक शेख यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. असे झाले तर काँग्रेस, भाजपा, माकप आणि एमआयएम अशी चौरंगी लढतीची शक्यता आहे. एमआयएमचा दबदबा राहणार का हे येणारा काळ ठरवेल.