महेश कुलकर्णी
सोलापूर : नरसय्या आडम मास्तरांना माकपाने तीन महिन्यांसाठी पक्षातून निलंबित केल्याचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे उलट कष्टकरी-कामगार खुश झाले आहेत. आतील माहितीनुसार हा आदेश मास्तरांसह कष्टकरी-कामगारांच्या पथ्यावर पडणार आहे.आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत लोकसभा निवडणुका आहेत. दिल्लीत महाआघाडी झाली अन् इथे मास्तरांचे निलंबन झाले. एका दगडात दोन पक्षी मारल्यामुळे आडम यांना काँग्रेसचा प्रचारही करावा लागणार नाही. यदाकदाचित केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यास तीस हजार घरांचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. यामुळे ‘मंचीगा आर्इंदी’ म्हणजे बरे झाले, असेच कामगार म्हणत आहेत.
समविचारी पक्षांनी भाजपाच्या विरोधात एकत्र लढण्यासाठी सर्व घटक पक्ष आणि प्रमुख धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेससमवेत आघाडी केली आहे. या आघाडीमध्ये माकपाही सहभागी आहे, याबाबतची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोलापूर दौºयावेळी केली.
सध्या कामगारांचे नेतृत्व माकपाचे नरसय्या आडम मास्तर हे करीत आहेत. ४० वर्षांपासून आडम हे कामगारांच्या पाठिंब्यावर सोलापुरात विधानसभा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे परंपरागत विरोधी असणारे आडम केंद्रात झालेल्या ‘महाआघाडी’मुळे पेचात सापडले होते. ज्या पक्षाला आयुष्यभर विरोध केला त्या काँग्रेसचा प्रचार लोकसभेला करायचा आणि विधानसभेला काँग्रेसच्या विरोधात लढायचे हे सूत्र कसे काय जुळवायचे, असा प्रश्न आडम यांना पडलेला असतानाच निलंबनाचा आदेश काढून पक्षाच्या केंद्रीय पॉलीट ब्युरोने या राजकीय कोंडीतून आडम यांची सुटका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौºयावेळी भाजपाच्या व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे कौतुक नरसय्या आडम यांनी केले, देशव्यापी संपात सहभाग घेतला नाही ही कारणे जरी सांगितली जात असली तरी खरे कारण ३० हजार घरांचे आहे. या घरांना भाजप सरकारने मंजुरी दिली आहे. पाच लाख रुपयांचे हे एक घर आहे. यातील अर्धी रक्कम केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे. प्रकल्पाचे सध्या काम सुरू झाले आहे. ही रक्कम द्यायचे सरकारने कबूूल केले आहे. अशा परिस्थितीत आडम यांनी लोकसभेला काँग्रेसचा प्रचार केल्यास कामगारांच्या स्वप्नातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत येईल. कारण पुढील सहा महिने राज्यात भाजपाचे सरकार आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
काय म्हणाले होते मास्तर...- ‘अनेक महिलांना आज लाडक्या पंतप्रधानांनी ३० हजार घरे दिली आहेत. मोदीजी.. ये श्टोरी भौत है..मैं अभी टाईम नही लुंगा. आघाडी सरकारने हमारी फैल तीन साल थंडे बस्ते में रखी.. या कामासाठी गेल्या आठ वर्षांपासून संघर्ष करतोय,’ अशा अस्सल सोलापुरी हिंदी भाषेत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मोदी यांचे कौतुक केले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही ‘राज्य के प्यारे मुख्यमंत्री’ असे उद्गार काढले होते.